प्रो-कबड्डी; सहाव्या हंगामाच्या तारखेची घोषणा
मुंबई
प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाची तारीख काल जाहीर झाली असून १९ ऑक्टोबर पासून धुराळा उडणार आहे. हंगामाचा अंतिम सामना २० जानेवारीला रंगणार आहे. प्रो-कबड्डीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरीही फेडरेशनने कबड्डी नॅशनल्स आणि फेडरेशन कप या दोन महत्वाच्या स्पर्धांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
मागील ५ हंगामांमध्ये कबड्डीने चाहत्यांची मने जिंकून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.आयपीएल नंतर एवढी लोकप्रियता प्रो-कबड्डीने मिळवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कबड्डी हा क्रिकेट व्यतिरीक्त सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ ठरला आहे. यंदाच्या हंगामात सेनादलाच्या मोनू गोयतला सर्वाधिक १.५१ कोटींची बोली लावण्यात आली होती. हरयाणा स्टिलर्सने मोनूला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. याव्यतिरीक्त राहुल चौधरी, दिपक निवास हुडा, नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि फैजल अत्राचली यांनाही यंदाच्या हंगामात कोटींच्या बोली लागलेल्या आहेत.