मालविका बनसोडे 'आशियाई विजेती'
नागपूर :
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र शासन व भारतीय खेळ महासंघाच्या (एसजीएफआय) संयुक्तविद्यमाने आयोजित आशियाई शालेय बॅडिमटन स्पर्धेमध्ये ( १८ वर्षांखालील)
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या आंतरराष्ट्रीय बॅडिमटनपटू मालविका बन्सोडने ७ व्या आशियाई बॅडिमटन मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या एकेरीत भारताचा एम. वरुणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर मलेशियाच्या खेळाडूंनी मुला-मुलींच्या दुहेरीत, मुलांच्या एकेरीत व मिश्र दुहेरीत बाजी मारली.
मालविकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत थायलंडच्या प्रतिस्पर्धीला २-० असे सरळ पराभूत करीत विजेतेपद पटकावले. मालविकाने पहिला गेम २१-१३ असा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. दुसरा गेमही मालविकाने २१-१२ असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य सामन्यात मालविकाने थायलंडच्या अतिताया पोवनानला २१-१७, २०-२२, २१-१२ आणि सोम सवांगसरीने भारताच्या दीपशिखा सिंगला १३-२१, २१-१७, २१-१३ असे नमवले होते. दोन्ही उपांत्य सामने चुरशीचे झाले. मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत पहिला गेम जिंकणाऱ्या भारताच्या एम. तरुणला अग्रमानांकित मलेशियाच्या कोक जिंग हांगने २-१ असे नमवले.