विविध मागण्यांसाठी आखोणीत रास्ता रोको
कर्जत / प्रतिनिधी
तालुक्यातील आखोणी येथील नांदणी नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा मंजूर ठिकाणीच करावा, तसेच राशीनचे मंडलाधिकारी अनारसे यांना निलंबीत करावे या मागणीसाठी आखोणी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्याचे आयोजन आखोणी ग्रामस्थांनी केले आहे. याबाबतचे निवेदने संबंधीतांना दिलेली आहेत.
आखोणी येथील नांदणी नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा जलसंधारण विभागामार्फत मंजूर झाला. आखोणी ग्रामपंचायतीने ठरावानुसार बंधारा करण्यासाठी जागा सुचवलेल्याच जागेवर शासनाने बंधारा मंजूर केला असतानाही, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अंभियंता वाबळे यांच्या मनमानी व सोयीच्या कारभारानुसार व चुकीच्या जागेवर बंधार्याचे काम सुरू करण्यात आल्याने, आखोणी येथील ग्रामस्थांनी आज आखोणी येथे राशीन- बारामती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती सा. कार्यकर्ते विष्णू सुळ यांनी लोकमंथनला दिली.
आखोणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंधारा मंजूर आहे. मात्र श्रीगोंदा येथील जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मनमानी कारभाराने बंधारा मंजुर ठिकाणी न करता दुसरीकडेच सुरू करून गावाचे व शेतकर्यांचे नुकसान केले जात आहे. यामुळे आखोणी गावचा रस्ता बंद होणार असुन मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी अडचणी उभ्या राहणार आहेत. या शिवाय आवश्यक असणारा पाणीसाठा होणार नसल्याने शासनाने दिलेले पैसे पाण्यात जाणार असल्याने या बंधार्याचा फायदा मात्र जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारास होणार असल्याने सुरू असलेले काम त्वरित बंद करून गावाने सुचविलेल्या जागेवरच काम करावे.
चैकट..
राशीन येथील मंडलाधिकारी अनारसे हे शेतकर्यांची अडवणूक करत असुन शेतकर्यांना अरेरावी करून गरीब व गरजवंताना अपमानीत करतात. कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत. उलट ते तक्रार करणार्यांना वाळू तस्करांची धमकी देतात. असा लेखी आरोपही भिमराव साकर, आंबादास सुळ, हनुमंत सुळ यांनी केला आहे.
चैकट...
आखोणी येथे मंजूर असणारा बंधारा पैसे खाण्यासाठीच दुसरीकडे काम केले जात आहे. कमी पाणीसाठा होणार आहे, हे माहीत असुनही या जागेवर बंधारा बांधण्याचा अट्टाहास का केला जातो. सुरू असलेले काम हे निकृष्ट व ओढ्यातीलच मातीमिश्रीत वाळू वापरून चालु आहे, त्यामुळे हे काम त्वरित बंद करून, गावाने सुचवलेली जागा व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार मंजूर ठिकाणीच बंधारा करावा व गावाचा रस्ता बंद करून, शासनानाच्या पैशाचा अपव्य करणार्या जलसंधारणच्या आधिकार्यांवर कारवाई करावी. विष्णु सुळ, अंकुश माने, काळुराम सायकर, भिका चव्हान यांनी केली.