Breaking News

राष्ट्रपतीकडून चौघांची राज्यसभेवर वर्णी राम शकल, सोनल मानसिंह, राकेश सिन्हा, रघुनाथ महापात्रा यांचा समावेश

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि कथ्थक नृत्यांगना सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे. सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रपती राज्यसभेसाठी 12 खासदारांची नियुक्ती करू शकतात. सिनेजगत आणि क्रीडा क्षेत्रातून एकाही व्यक्तीला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेली नाही.

राम शकल :
राम शकल उत्तर प्रदेशचे असून गेल्या चाळीस वर्षांपासून ते समाजसेवेत कार्यरत आहेत. शकल यांनी गोरखपूर विद्यापीठातून एमएची पदवी घेतली आहे. दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठे कार्य उभारले आहे. शेतकरी, मजूर वर्ग आणि प्रवासी यांच्या हितासाठी ते कार्यरत आहेत.
राकेश सिन्हा : 
सिन्हा प्रसिद्ध स्तंभलेखत असून दिल्लीमधील थिंक टँक इंडिया पॉलिसी फाऊंडेशचे ते संस्थापक आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरु कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. ते सध्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन मंडळाचे सदस्य आहेत. ते अनेक वृत्तपत्रांत नियमितपणे स्तंभलेखन करतात. सिन्हा संघ विचारांचे आहेत.
रघुनाथ महापात्रा :
शिल्पकलेमधले महापात्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेले मोठे नाव आहे. 1959 पासून ते काम करत असून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी पारंपारिक शिल्पाकृती आणि प्राचीन स्मारके जतन करण्यासाठी योगदान दिले आहे. श्री जगन्नाथ मंदिर, पुरीच्या सुशोभीकरणाचे कार्य त्यांनी केले आहे. पॅरिसमधल्या बुद्ध मंदिरातील बुद्ध महापात्रा त्यांनी साकारला आहे.
सोनल मानसिंह :
74 वर्षीय सोनल मानसिंह या ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना आहेत. गेल्या 6 दशकांपासून त्या भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य सादर करतात. नृत्य दिग्दर्शिका, शिक्षिका, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. पद्मविभूषण आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य केंद्राची त्यांनी 1977 मध्ये स्थापना केली.
-----------------------------------------------------