महावितरण कंपनीविषयी तीव्र असंतोष
राहुरी तालुका प्रतिनिधी
तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास महाविरण कंपनी पूर्णपणे अपयशी ठरत आहे. त्यामुळे जनतेत महावितरणविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
मुळा प्रवरा सहकारी वीज सोसायटीचा विज वितरणाचा परवाना रद्द झाल्यापासून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील राहुरी, श्रीरामपूर, राहाता आणि नेवासा तालुक्यातील काही गावांत महावितरण कंपनी वीज पुरवठा करीत आहे. प्रारंभी काही दिवस महावितरणने सुरळीत वीज पुरवठा केला. त्यामुळे वीज ग्राहकांना सुखद धक्का बसला. मात्र कंपनीचा हा सुखद धक्का ‘नव्या नवरीचे दहा दिवस’ या म्हणीप्रमाणे ठरला. काही दिवसानंतर वीज पुरवठ्याचा पुन्हा बट्ट्याबोळ झाला. आजपावेतो हा बट्ट्याबोळ सुरूच आहे. महावितरण सुरळीत वीज पुरवठा देण्यात अपयशी ठरली आहे. वीज पुरवठ्याकडे महावितरण कंपनीचे एक प्रकारे दुर्लक्ष असून केवळ वसुलीकडेच कंपनीची पसंती आहे. ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करायचा नाही. मात्र अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करून ग्राहकांना कंपनी वेठीस धरायचे, असे मतलबी धोरण महावितरणने स्विकारले आहे. यामुळे महावितरणविषयी जनतेत असंतोष व्यक्त होत आहे.
शहरी भागात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होतो. ग्रामीण भागात तर भयानक अवस्था आहे. १२- १२ तासांच्या भारनियमनामुळे ग्रामीण भागाचे आर्थिक कोळमोडले आहे. अनेक ठिकाणी अद्याप सिंगल फेज वीज पुरवठा कार्यान्वित नाही. जेथे आहे , तेथे कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. सिंगल फेज वीज पुरवठ्याचाही फज्जा उडालेला आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने कार्यक्षेत्रात ‘प्री मान्सून वर्क’ करणे गरजेचे होते. मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळा सुरू होताच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले.
महाविरण कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नाही. अनेकवेळा अधिकारी कार्यालयात भेटत नाहीत. कर्मचारीही ग्राहकांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण करतात. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी जनतेतून होत आहेत. वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मच्-यांना योग्य सूचना करून वीज पुरवठा सुरळीत करण्यास भाग पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.