अंधेरी- विलेपार्ले स्टेशन दरम्यान आज सकाळी ७.३० सुमारास गोखले पुलाचा काही भाग कोसळला. रेल्वे ट्रॅकवरच पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे. यामध्ये चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. पोलीस, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर ढिगारा हटवायचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. कोसळलेल्या पुलावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे असेही मुंबईत रस्ते, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. आता ट्रँफिक जाम होत आहे. चर्चगेट-वांद्रे व गोरेगाव-विरार दरम्यानची रेल्वे सेवा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान फार गर्दीची वेळ नसल्याने किंवा पुलाखालून रेल्वे जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलामुळे ओव्हरहेड वायरही तुटलेल्या आहेत. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे. या ठिकाणी गर्दी करू नका. तुमच्याकडे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात येत आहे.