Breaking News

राजकीय पक्षांना मरगळ

सुुभाष माळवे / कर्जत 
तालुक्यात व शहरामध्ये आजच्या घडीला सर्वच राजकीय पक्षांना मरगळ आली असून कुठल्याच राजकीय पक्षाकडे ठोस कार्यक्रम नसल्याने हे राजकीय पक्ष कुठल्याही सामाजिक तसेच नागारिकांच्या प्रश्‍नावर आंदोलन करताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर झळकणे याचपुरते राजकीय पक्ष मर्यादित आहेत, की काय असा प्रश्‍न सर्वसामान्य कर्जतकरांना पडला आहे. कर्जत तालुक्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पार्टी, मनसे, आर.पी.आय. बहुजन समाज पक्ष, यांसह राज्य-राष्ट्रीय पातळीवरील जवळपास सर्वच राजकीय पक्ष शहरात कार्यरत आहेत. शहरातील अनेक गंभीर समस्यांवर या पक्षांनी हिरीरीने उडी घेवून त्या प्रश्‍नासाठी लढा देणे गरजेचे असताना, कुठलाच पक्ष नागरिकांच्या प्रश्‍नासाठी लढा देणे गरजेचे असताना कुठलाच पक्ष नागरिकांच्या प्रश्‍नासाठी किंवा शहरांतील समस्यांबाबत रस्त्यावर उतरताना दिसत नाही. सर्वच पक्षांतील पदााधिकारी व कार्यकर्त्यांना आपण नगरसेवक होऊ याकडे कल आहे. आज कच-याची समस्या हाताबाहेर चालली आहे. शहरात महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. धुळीचा प्रश्‍न अतिशय बिकट आहे, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्‍न अशा अनेक समस्या शहरात आ वासून उभ्या आहेत. तरिही हे राजकीय पक्ष कुठेही नागरिकांच्या प्रश्‍नाला टोकाची भूमिका घेत भांडताना आजपर्यंत दिसले नाहीत.
शहरातील कुठल्याच पक्षाकडे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात कुठलाच अजेंडा नाही. फक्त पक्षाचा अजेंडा राबविणे, त्यासाठी फोटोसेशन करणे, सोशल मीडिया, वर्तमानपत्रात बातम्या देणे एवढेच कार्य सर्वच राजकीय पक्षाचे सुरू आहे. काहीही होऊ द्या मात्र, मला नगरसेवक किंवा पद द्या. नागरिकांचे प्रश्‍न सुटले नाही तरी, चालतील आशा धोरणामुळे राजकीय पक्षांची भरभराट कर्जतमध्ये झालेली दिसत नाही. पक्षांचे वरिष्ट नेते आल्यानंतर त्याच्या पुढे-पुढे करणे व आपण कसे सर्वसमावेशक पदाधिकारी आहोत हे दाखविणे, यातच सर्व पक्षांचे कार्यकर्ते धन्यता मानत आहेत.


कर्जत शहरात सर्वात जास्त प्रश्‍न महिलांचे आणि विद्यार्थी यांचे आहेत. या प्रश्‍नावर कुठलेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. तसेच नागरिकही जागरूकपणे पुढे येत नसुन तेरी भी चुप मेरी भी चूप याप्रमाणे सर्व काही चालू आहे. गरज कोणालाच नाही, अशा प्रकारे वागत आहेत. कर्जत शहरात चौकात, बाजारपेठेत, मुख्य रस्त्यावर महिलांना स्वच्छतागृहे नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असून शाळकरी मुली, कॉलेजच्या युवती, कर्जत ग्रामीण, श्रीगोंदा, जामखेड येथून खरेदी व अन्य कारणांसाठी कर्जत शहरात आल्यानंतर स्वच्छतागृह कुठं अन् जायचं कुठं हा प्रश्‍न पडतो. कर्जत शहरात बसस्थनकातील स्वच्छतागृहांवर ताण येत आहे. बसस्थानक केवळ एकमेव पर्याय म्हणून तिकडे महिलांना जावे लागते.


महिला संघटना नावापुरत्याच...
कर्जत शहरात जवळपास 8 ते 10 महिला सामाजिक संघटना आहेत. मात्र आजपर्यंत त्यांनीही या गंभीर बाबीवर आवाज का उठवता आला नाही. हा मोठा प्रश्‍न आहे. केवळ सोशल मीडियावर फोटो टाकणे, विविध विभागांना महिलांच्या प्रश्‍नांवर निवेदन देणे, यापलीकडे काहीच होताना दिसत नाही. या महिला संघटना जर या प्रश्‍नांवर आंदोलन करत नसतील तर, यासारखी खेदाची बाब नाही.


मानसिक त्रास...
सध्या मुला-मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरू असुन त्यासाठी, लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना कर्जतच्या सेतु कार्यालयात जावे लागते. संबंधित ठिकाणी विर्थ्यांना व पालकांना भरमसाठ पैसे खर्च करून व पाच-पाच हेलपाटे मारूनही दाखले मिळत नाहीत. मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा गंभीर प्रश्‍नावर कुठलाच राजकीय पक्ष पुढे आलेला दिसत नाही.