Breaking News

मुलींच्या खांद्यावरील जोखड आता बैलांच्या खांद्यावर


अकोले / प्रतिनिधी 
बैल घेण्याची कुवत नसल्याने सुन आणि मुलीच्या खांद्यावर जोखड घेऊन बैलासारखे काम करावे लागत असल्याची घटना आदिवासी अकोले तालुक्यात उघड झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेना या गरीब शेतकर्‍याच्या मदतीला धावून आली आहे. अंबरनाथच्या शिवसैनिकांनी या शेतकर्‍यास एक तरणा बांड खिलार जातीचा बैलजोड घेवून दिला आहे. त्यामुळे या शेतकर्‍याच्या मुलीच्या आणि सुनेच्या खांद्यावरील जोखड आता बैलांच्या खांद्यावर जाणार आहे.
अकोले तालुक्यातील राजूर परिसरात राहणार्‍या, महादू भारमल या आदिवासी शेतकर्‍याने दोन वर्षांपूर्वी आपल्या थोरल्या मुलीच्या लग्नावेळी आपला घरचा बैलजोड विकून टाकला.शेतमालाला बाजारभाव नाही, कायमची बेरोजगारी यामुळे महादू भारमल यांना नव्याने बैलजोडी घेणे अशक्यप्राय होऊन गेले. त्यामळे शेतातील मशागतीसाठी महादू भारमल यांची सून कविता भारमल, मुलगी संगिता भारमल या नवदुर्गांनी बैलांची जागा घेतली. या दोन्ही नणंद-भावजयी उच्च शिक्षित आहे. म्हणतात ना गरिबीला लाज नसते, त्यामुळे जग काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करीत, या दोघींनी नांगर खांद्यावर घेवून, आपली शेती पिकविण्याचा निर्धार केला. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या मशागतीसाठी बैलांची नितांत आवश्यकता होती. मात्र भारमल कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आपल्या गरिबीला झुगारित मन घट्ट करून, शेतात बैलांऐवजी आपल्या मुलींना उतरविले. या नणंद भावजयीने देखील जोखड खांद्यावर घेवून कोळपणीला सुरुवात केली. सात ते आठ एकर शेती असलेल्या भारमल कुटुंबाला सर्वच शेताची मशागत करणे अशक्य होते. परंतु निम्म्याहून अधिक शेताची कोळपणी कविता आणि संगिता या नणंद भावजयी यांनी मार्गी लावली. काही माध्यम प्रतिनिधींनी ही गोष्ट सविस्तर मांडल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली. त्यामुळे अनेक दानशूर व्यक्तिमत्व पुढे येऊ लागले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेच्या वाळेकर कुटुंबांनी ही घटना माध्यमांवर पाहिली. काळजाचा ठेका चुकविणारी ही बातमी पाहून, त्यांनी या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथच्या अरविंद वाळेकर या शिवसेना शहरप्रमुखाने चांगल्या दर्जाची बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. काल सकाळी या शेतकर्‍यास ही बैलजोडी देण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास पांढरीशुभ्र बैलजोडी राजूर परिसरात दाखल झाली.स्थानिक ग्रामस्थांनी ही बैलजोडी गाडीतून खाली उतरविली. यावेळी खास अंबरनाथहुन आलेल्या अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, मिलिंद पाटील, विजय पवार, गटनेते राजू शिर्के यांनी बैलांवर गुलाल उधळीत बैलांना सजविले. नवीन बैलजोडी पाहून भारमल कुटुंबाला अश्रू अनावर झाले. यावेळी अंबरनाथच्या शिवसैनिकांनी भारमल कुटुंबाला कपडे, मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अरविंद वाळेकर म्हणाले की, शिवसेना म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे समीकरण आहे. आम्ही समाजकारण म्हणून भारमल कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यापुढील काळात ही भारमल कुटुंबाला मदत करू, असे आश्‍वासनही वाळेकर यांनी दिले. यावेळी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे, युवानेते सतीश भांगरे, उपसभापती मारूती मेंगाळ, रजनीकांत भांगरे, सुदेश मुतडक आदी उपस्थित होते. आभार युवानेते सतीश भांगरे यांनी मानले. वाळेकर कुटुंबियांच्या या दातृत्ववादी निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


महादू भारमल कुटुंबियांच्या तिनही मुलींच्या लग्नाची जबाबदारी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी स्विकारली असुन, राजुर गटाच्या जि. प. सदस्या सुनिता भांगरे यांनी या कुटुंबाच्या शेतीसाठी आदिवासी उपाय योजनातुन अडीच लाख रु विहीरीसाठी देण्यात येणार असुन, मुलीसांठी स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.