भगवद्गीता नक्की संस्कृतमध्ये की गुजरातीत? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
पुणे - शाळांमधून भगवद्गीता वाटपाचा राज्य सरकारचा निर्णय आणि सहावीच्या इयत्तेतील पुस्तकात गुजराती पाने असल्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. या दोन्ही मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर एका बाणातच निशाणा साधला आहे. भगवद्गीता मला चाळायची आहे, ती नक्की संस्कृतमध्ये की गुजरातीत आहे, असा उद्धव ठाकरेंनी भाजपला तिरकस टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल उशीरा लागले होते. तसेच पुणे विद्यापीठातील परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरूनही त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा समाचार घेतला. परीक्षा निकाल वेळेवर न लागणे, पेपरफुटी प्रकार हे सगळे झाकण्यासाठी भगवद्गीता पुढे आली का? असा त्यांनी सवाल केला. राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे हे सगळे व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या गोष्टी आतापर्यंत का झाल्या नाहीत, असा त्यांनी सवालही केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी 2019 पूर्वी राममंदिर उभारण्यात येईल, असे विधान केले होते. त्यावर नोटबंदी एक क्षणात झाली तसे राममंदिर का होऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.