मूलनमाथा परिसराला सापत्नभावाची वागणूक; जनआंदोलन करणार : पठाण
राहुरी प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील मूलनमाथा परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती आदी समस्यांनी कायम त्रस्त असलेल्या मूलनमाथा या भागाला नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी यांच्याकडून सापत्न वागणूक मिळत आहे. त्यामुळे येथील विकासकामे व जनतेच्या प्रश्नांसाठी जनांदोलन उभारणार आहोत, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जू पठाण यांनी दिली.
ते म्हणाले, राहुरी शहर ‘स्मार्ट सिटी’ करणार असे म्हणणारे नगराध्यक्ष व सत्ताधारी यांनी इतर प्रभागात विकासकामे करताना या परिसरात येथील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँक्रिट अथवा डांबरी रस्ते करावेत. येथील जनतेला स्वच्छ पिण्याचा पुरवठा करावा. येथे स्वच्छता अभियान राबवून येथील नागरिकांचे प्रबोधन करावे. पावसाळ्यात येथील रस्ते दलदलीचे होतात. त्यामुळे येथे पायी चालणेदेखील अवघड होऊन जाते. याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. येथील रस्त्यांचा निधी नगरपरिषदेकडे मंजूर झालेला असताना येथे रस्त्यांचे काम केले जात नाही.
दुरीकडे उच्चभ्रू वसाहतीत मात्र मजबुत रस्ते बनविण्यात आले आहेत. शहरात घरकुल योजना प्रभावीपणे राबवित जात आहे. येथील गोरगरिबांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. येथील नागरिकांना हक्काची घरकूल योजना मंजुर होणेबाबत नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. येथे स्वच्छता व्यवस्था दयनीय आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून लोकशाही मार्गाने जनांदोलन उभारणार असल्याचा निर्धार केला आहे.