Breaking News

अकोले तालुक्यात मराठी शाळांचा टक्का वाढला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आता मराठी माध्यमात

आदिवासी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यात मराठी शाळांच्या प्रवेशाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. समाजातील खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करणार्‍या पालकांना ही सणसणीत चपराक म्हणावी लागेल.काही सूज्ञ पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी हुरळून गेलेले पालक मराठी माध्यमाकडे मिळाल्याने खर्‍या अर्थाने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला नवसंजीवनी मिळाली आहे.
नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून, आदिवासी अकोले तालुक्याची ओळख आहे. तालुक्यातील खेड्या पाड्यासह वाड्यावस्त्यांवर तब्बल 389 जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू आहेत. मध्यंतरी कमी पटसंख्येअभावी अकोले तालुक्यातील 14 मराठी माध्यमाच्या शाळांवर टाच आली आहे. त्यामुळे हा आकडा काहिसा कमी आहे. 191 गावांची संख्या असलेल्या आदिवासी अकोले तालुक्यात 389 मराठी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत, ही अकोले तालुक्यासाठी भूषणावह बाब आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अकोले तालुक्यातील चारही विभागांत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपले जाळे विणल्याने मराठी माध्यमाच्या शाळांच्या पट संख्येवर चांगलीच गदा आली होती. मात्र यंदा राज्य शासनाने मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी गावोगावी, रस्त्यांच्या कडेला पालकांचे प्रबोधन होईल, अशी पोस्टरबाजी केली. तसेच मराठी माध्यमाच्या शाळेत जाणीवपूर्वक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक गुणदर्शन सोहळा, बालआनंद मेळावा यासारखे अनेक कार्यक्रम शिक्षण विभागाने राबविले. त्यामुळे पाल्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू लागली. इंग्रजी माध्यमात पाल्यांना शिकायला टाकून पालकांच्या पैशाची नाहक उधळपट्टी देखील व्हायची. त्यातच या मुलांवर इंग्रजी विषयाचा इतका प्रभाव पडला होता की, मराठी भाषेची आकलनशक्तीच हे मुले हरवून बसले होते. इंग्रजी भाषा आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. परंतु मराठी ही मातृभाषा असून, तिलादेखील अनन्य साधारण महत्व आहे. मात्र समाजात मिळणार्‍या खोट्या प्रतिष्ठेसाठी अनेक पालकांनी आपल्या खिशाला आर्थिक झळ देवून आपले पाल्य इंग्रजी माध्यमात भरती केली. उशिरा का होईना या पालकांना आपली चूक लक्षात आली. त्यामुळे त्यांनी सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा प्रवेश गाव पातळीवर असणार्‍या मराठी माध्यमाच्या शाळेत घेतला आहे. पालकांच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या शाळा उर्जितावस्थेत येणार आहेत. अकोले तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांची संख्या गत वर्षीपेक्षा चांगलीच वाढली आहे.


आदिवासी अकोले तालुक्यातील मराठी माध्यमाच्या 389 शाळांमध्ये 20 हजार 900 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. यामध्ये 11 हजार 450 विद्यार्थी असून 9 हजार 450 विद्यार्थिनी आहेत. सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात 1700 विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल झाले आहेत. तसेच इंग्रजी माध्यमात शिकणारे 117 विद्यार्थी मराठी माध्यमाकडे त्यांचा कल वाढलेला आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन काहिसा वेगळाच होता. मात्र अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मराठी शाळा वाचवा, हे अभियान गावोगावी पोहचवून पालकांमध्ये जनजागृती केली. मुख्य रस्त्यांवर मराठी माध्यमाच्या शाळांच्या उपक्रमांची माहिती दर्शविणारे फ्लेक्स सर्वत्र लावण्यात आले. त्यामुळे अनेक पाल्य इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाच्या शाळेकडे वळाले आहेत. पालकांच्या या भूमिकेमुळे अकोले तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे.
- मारुती मेंगाळ, उपसभापती, अकोले, पं.स