बँक शेतकर्यांच्या विश्वासास पात्र : वाघ
कुळधरण / प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर कारखाना येथे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, मीनाक्षी साळुंके, रावसाहेब शेळके, कैलास वाकचौरे, मंजुषा गुंड, राजेंद्र गुंड, दत्ता वारे, मधुकर राळेभात आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा. चेअरमन रामदास वाघ यांनी केले. शेतकर्यांच्या विश्वासाला बँक पात्र ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
नोटाबंदीमुळे बँक अडचणीत आहे. तरिही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगती करीत आहेत. भविष्यात ग्राहकांना सोने तारण व लॉकर सुविधा बँक पुरवणार आहे. शाखेचे उदघाटन असले तरी, राजकीय आरोपही करण्यात आले. माजी जि. प उपाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, भाजपच्या शेतकरी विरोधी धोरण व नोटाबंदीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. संचालिका मिनाक्षी साळुंखे म्हणाल्या, या मंचावर तालुक्यातील सर्व नेते हेवेदावे सोडून आले आहेत. असाच एकोपा जर टिकला तर निश्चितच तालुक्यात परिवर्तन घडेल. अध्यक्षीय भाषणात संचालक अंबादास पिसाळ म्हणाले की, काही अडचणींमुळे बँकेची नोकरभरती रखडलेली असल्याने, कर्मचार्यांची कमतरता भासत आहे. कर्जत, भांबोरा, बिटकेवाडी येथे कर्मचार्यांची कमतरता आहे, ती भरावी. सर्व संचालक मंडळाचा कारभार चांगला असून, बँक भरभराटीला येत आहे. श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनीही आपले मत मांडलेे.
या कार्यक्रमात भांबोरा शाखेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय मोढळे, नितिन धांडे, शंकर देशमुख, पप्पु धुमाळ, सुदर्शन कोपनर, डॉ. संदीप बोराटे, बाळासाहेब शिंदे, प्रमोद शेळके आदींची उपस्थिती होती.