Breaking News

अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी चौकशी करण्याचे उपजिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

राहुरी तालुक्यातील मौजे करजगाव, जातप व त्रिंबकपूर येथे प्रवरा नदीपात्रातून चालू असलेल्या बेसुमार अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याने संबंधीत ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुकारलेले आत्मदहन आंदोलन चौकशीचे आश्‍वासन मिळाल्याने तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा करुन जरे यांनी अनाधिकृत वाळू उपसाचा प्रश्‍न मांडला. पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मनिषा गायकवाड, सोनाली जरे उपस्थित होत्या.

राहुरी तालुक्यातील मौजे करजगाव, जातप व त्रिंबकपूर येथे सन 2018 वर्षा करीता प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र वाळू ठेका घेणार्‍या संबंधीतांनी ठरलेल्या लिलावाच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त जेसीबी, पोकलॅड आदी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा रात्रं दिवस चालवला आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात नदी पात्रातून वाळू उपसा चालू असून, चलन पावत्यांचा दुरोपयोग करुन रात्री चोरट्या पध्दतीने वाळू वाहतुक सुरु आहे. ठरलेल्या लिलावाच्या प्रमाणापेक्षा अधिक हजारो ब्रास वाळू नदीपात्रातून उचलण्यात आलेली आहे. नदी पात्रात ठरलेल्या ठिकाणासह इतर ठिकाणी देखील बेसुमार वाळू उपसा चालू असल्याने स्थानिक महिलांच्या तक्रारीवरुन संबंधीतांवर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले होते. मात्र अशा वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने रेखा जरे पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या चौकशीच्या आश्‍वासनाद्वारे दोषी अढळणार्‍या वाळू ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा जरे यांनी दिला आहे.