Breaking News

अंधेरी पुल दुर्घटनेत 5 जण जखमी ; मुंबईकरांची दैना पावसामुळे मुंबईची झाली तुंबई !


मुंबई : शहरासह उपनगरात झालेल्या पावसामुळे मुंबईची पार दैना झाली असून, त्यातच अंधेरी विलेपार्ले स्टेशन दरम्यान मंगळवारी सकाळी 7:30 सुमारास गोखले पुलाचा बराचसा भाग कोसळून चार जण जखमी झाले. रेल्वे ट्रॅकवरच पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्‍चिम रेल्वेची वाहतूक अनिश्‍चित काळासाठी ठप्प झाली आहे. यामध्ये चार जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढले. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. पोलीस, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर ढिगारा हटवायचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.
पावसामुळे अंधेरीतील गोखले पादचारी पुलाचाही काही भाग कोसळला आहे. अंधेरी ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा पूल असून येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील लोकलसेवाही ठप्प झाली आहे. घटनास्थळी 4 अग्निशामक गाड्या दाखल झाल्या आहेत. मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला असून अद्यापही संततधार सुरूच आहे. यामुळे सायन रेल्वे स्थानकावरील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला आहे. तसेच, शहरातील किंगस सरकल आणि माटुंबा भागासह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. चेंबूर, कुर्ला, वांद्रे, खार, विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, दहीसर, बोरीवली, सायन, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत शहरात 110 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत आणखी काही तास हा पाऊस असाच सुरु राहिला तर वाहतूकीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. 
चौकट........
मोठी दुर्घटना टळली...
चर्चगेट-वांद्रे व गोरेगाव-विरार दरम्यानची रेल्वे सेवा सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान फार गर्दीची वेळ नसल्याने किंवा पुलाखालून रेल्वे जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलामुळे ओव्हरहेड वायरही तुटलेल्या आहेत. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना आवाहन आहे. या ठिकाणी गर्दी करू नका. तुमच्याकडे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात येत आहे.