Breaking News

100 शाळांना एलसीडी प्रोजेक्टरचे लोकार्पण


जामखेड / श. प्रतिनिधी 
नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून, कर्जत-जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांना दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेता येईल. भविष्यातील पिढी तयार करताना अशा पद्धतीचे शिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. दरम्यान, कर्जत-जामखेड या मतदारसंघातील प्रत्येक गावांना शुद्ध व फील्टर स्वरुपात पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आर.ओ. यंत्रणा विविध उद्योग समुहांच्या मदतीने सीएसआरच्या माध्यमातून बसविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पंचायत समिती कर्जत-जामखेड व नॅशनल इन्शुरन्स कपंनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कर्जत-जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 100 शाळांना इन्शुरन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून एलसीडी प्रोजेक्टरचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पार पडला. कर्जत तालुक्यातील 54 आणि जामखेड तालुक्यातील 46 शाळांना 70 लाख रुपयांच्या या एलसीडी प्रोजेक्टरचे वितरण संबंधित शाळांना प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अण्णासाहेब डांगे, जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या क्षेत्रीय प्रबंधक, आर के एल्लाबादी, वरिष्ठ मंडळ प्रबंधक प्रमिला जाधव, कर्जत पं. स. सभापती पुष्पा शेळके, जामखेड पं.स. सभापती सुभाष आव्हाड आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे तंत्रज्ञान उपलब्ध होणे हे त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक आहे.