अंगावर वाळूची धडी कोसळून एक जण गंभीर जखमी
अकोले : तालुक्यातील मेहेंदुरी येथे वाळूची धडी अंगावर कोसळून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे वाळूची चोरटी वाहतूक करणार्या वाळूतस्करांची आणि जागा मालकाची पायाखालची वाळूच सरकली.
मेहेंदुरी गाव परिसरात संगारे यांच्या मालकीच्या शेतात वाळूची अनधिकृत धडी सुरू आहे. या वाळूच्या धडीतून आत्तापर्यंत अनेक ट्रॅक्टर भरून बाहेर काढण्यात आले. सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जेसीबी मशीन लावून वाळू काढण्याचे जोरदार काम सुरू होते. वाळू तस्करांनी सुमारे 20 फूट खोल वाळूची धडी खोदली होती.त्यामुळे जमिनीच्या वरच्या भागात मोठी कपार तयार झाली होती. वाळू काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक हादर्याने ही वाळूची कपार कोसळली. आणि खाली वाळू भरण्याचे काम करणारा संतोष काळे हा आदिवासी ठाकर समाजातील तरुण पुर्णपणे गाडला गेला. धडीचा त्याला जोराचा मार लागल्याने त्याच्या नाका तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. ही घटना पाहून वाळू तस्करांची पुरती भांबेरी उडून गेली. संतोष काळे याला बाहेर कसे काढता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु धडी क्षमतेपेक्षा जास्त मोठी असल्याने संतोषच्या अंगावरील वाळू त्यांना बाजूला करता येईना. अखेर जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. सुमारे पाच मिनिटांच्या खोद कामानंतर संतोष काळे यास बाहेर काढण्यात आले.अंगावर धडी कोसळल्यामुळे संतोष काळे हा बेशुद्धावस्थेत होता. तर त्याचे शरीर पूर्णपणे वाळूत दाबले गेल्यामुळे तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता. या अवस्थेत सुरुवातीला त्यास अकोले शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णाची गंभीर अवस्था पाहून त्यास पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले.दरम्यान संतोष काळे याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याच्या कमरेपासून खालील भागास काहीच जीव राहिला नसल्याचे समजले आहे. अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी अशा अनधिकृत वाळूच्या धड्या सुरू आहेत. या धड्यांच्या खोदकामामुळे मोठी जीवितहानी घडू शकते. महसूल विभागाने अशा धडी खोदणार्या वाळू तस्करांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.
संतोष काळे हा तरुण निराधार आहे. तो रुम्भोडीत आपल्या सासरी घर जावई म्हणून वास्तव्यास आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी संतोष हा वाळू भरण्याचे काम करीत होता. या दुर्घटनेमुळे संतोष यास कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित वाळू तस्कराने संतोष काळे याच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्यावी, अन्यथा ठाकर समाज संघटना रस्त्यावर उतरले, असा इशारा देण्यात आला आहे.