पोलिस कोठडीतून थेट रुग्णालयात प्रसूती
श्रीगोंदा / प्रतिनिधी
शहराजवळील भिंगाण येथील वैभव पारखे या लहान दिराचा, संपत्तीच्या वादातून खून केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेली, आरोपी महिला काजल शांतीलाल पारखे हिला श्रीगोंदा येथील पोलिस कोठडीत प्रसूती पुर्व वेदना सुरू झाल्या. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी काजलला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे घेवून जाताच, काही क्षणात तिने मुलाला जन्म दिला. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. समजलेली अधिक माहिती अशी की, भिंगाण येथील वैभव पारखे या सात वर्षांच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी काजल पारखे हीस अटक केली.
काजलला अटक करण्यापुर्वी दिवस गेले होते. श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस दरमहा काजलचे ग्रामीण रुग्णालयात नेवून वैद्यकीय तपासणी करीत होत्या, काजलला आठवा महिना सुरू होता. तिला आठ दिवसानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. पोलिस कोठडीत असताना मंगळवारी तिला प्रसूतीपुर्व वेदनांचा त्रास होऊ लागला, काजलला पोलिस कोठडीतून बाहेर काढले आणि काजलची श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुखरुपपने झाली, मात्र मुलाचे वजन कमी असून आई सुखरुप आहे. मात्र पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक निलेश कांबळे, महावीर जाधव हे ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीवेळी जातीने उपस्थित होते. काजलला प्रसूतीसाठी देण्यात येणारी शासनाची चार हजारांची मदतही देण्यात आली.