Breaking News

ताडोबात ‘व्हीआयपी’ भ्रष्टाचार खपवून घेणार नाही- हायकोर्ट

नागपूर, दि. 28, जून - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात व्हीआयपीच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने पर्यटकांना प्रवेश दिला जातोय. त्याचा वन्य जीवनावर दुष्परिणाम होतोय. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, बुधवारी झालेल्या सुनावणीत ‘व्हीआयपी’च्या नावाखाली भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे वन विभागाला खडसावत एक आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिलेत. 
यासंदर्भात ग्राहक संरक्षण कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने 15 ऑक्टोबर 2012 रोजी व्याघ्र संवर्धन व पर्यटकांच्या वन भ्रमणासंदर्भात मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार अभयारण्यामध्ये रोज केवळ 125 पर्यटकांनाच प्रवेश दिला जाऊ शकतो. परंतु, ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात ‘व्हीआयपी’च्या नावाखाली नियमापेक्षा जास्त पर्यटकांना प्रवेश दिला जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
यासंदर्भात आज, बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. झेड.ए. हक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत वन विभागाने सांगितले की, व्हीआयपींना ताडोबामध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. परंतु, ताडोबामध्ये व्हीआयपी म्हणून प्रवेश देण्यात येणारे सर्व पर्यटक व्हीआयपीच असतात हे त्यांना सिद्ध करता आले नाही. सुनावणीदरम्यान, न्यायालयाला काही प्रश्‍नांची योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे न्यायालयाने प्रधान मुख्य वन संरक्षक ए. के. मिश्रा यांना दुपारनंतर न्यायालयात बोलावून घेतले. त्यानुसार, मिश्रा न्यायालयात उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीतही वन विभागाची बाजू सावरण्याचा बराच प्रयत्न झाला. परंतु, न्यायालयाचे समाधान होऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने वन विभागाला चांगलेच फैलावर घेतले. स्थानिक नेत्यांनी सांगितलेल्या लोक ांनाही तुम्ही ‘व्हीआयपी’ म्हणून ताडोबामध्ये प्रवेश देणार काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, ताडोबात व्हीआयपी म्हणून प्रवेश देण्यात आलेल्या पर्यटकांच्या नावांची माहिती मागितली. त्याची माहिती वेळेवर वन विभागाकडे उपलब्ध नव्हती. परिणामी, न्यायालयाने वन विभागाला यावर एक आठवड्यात ठोस स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ ॅड. तुषार मंडलेकर यांनी युक्तीवाद केला.