Breaking News

राष्ट्रवादीत गटबाजी : पक्ष स्थापन दिनही स्वतंत्र साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत योगदान देऊन, पक्षवाढीचे काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून कोठारी कूटूंबाची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत पक्षाच्या जडणघडणीत प्रत्येक टप्प्यावर स्वर्गीय सुभाष कोठारी हे कट्टर समर्थक राहिले होते. त्यांच्या पश्‍चात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर तालुक्यात कायम वाजत ठेवत, राजेंद्र कोठारी हेही राष्ट्रवादी या पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. 

दि. 10 जून रोजी जामखेडमध्ये नूकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन दोन गटांनी स्वतंत्रपणे साजरा केला. ज्या दोन गटांनी अनेक मूळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वगळून स्थापना दिन स्वतंत्रपणे साजरा केला, यावरून राष्ट्रवादीत असलेली गटबाजी पुन्हा स्पष्ट झाली. सध्या या गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक ही अनेक महिन्यांपासून पुढे ढकलत आहे. पक्षश्रेष्ठींसमोर मीपणा आणि गटबाजीने पक्षश्रेष्ठींसमोर तालुकाध्यक्ष निवडीचा पेच निर्माण केला आहे. तालुकाध्यक्ष पदाच्या रस्सीखेचात आपापला प्रभाव दाखवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष स्थापन दिनही दोन गटांनी स्वतंत्रपणे साजरा केला. राजेंद्र कोठारी अनेक वर्षांपासून तालुकाध्यक्ष पदाबरोबर पक्षाच्यावतीने अनेक पद सांभाळत पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास संपादन करत राहिले. मात्र दरम्यानच्या काळात सामान्य व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना विश्‍वास व न्याय देता न आल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज झाले. पक्षांतरात काही गेले, परत आले तर तर काही नवीन राष्ट्रवादीत आले. यामुळे पक्षात गटबाजीला उधाण आले. राजेंद्र कोठारी यांनी पक्षात वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवले. मात्र होमग्राऊंडवर दुर्लक्ष झाल्यामुळे गटबाजी रोखण्यात, अपयशी ठरल्याने राजेंद्र कोठारी यांना तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या पक्षाला तालुकाध्यक्षच नाही. गटबाजीमुळे तालुकाध्यक्षाची निवड पक्षश्रेष्ठींना अद्याप करता आली नाही. त्यातच दोन गटांनी आपापला प्रभाव दाखविण्यासाठी स्वतंत्र स्थापना दिन साजरा केला. यावेळी गटबाजीत भरच पडली. दत्ता वारे हे मूळ भाजपचे असून शिर्डीचे खासदार तथा पंधरा वर्षे जामखेडला भाजपाचे आमदार राहिलेले सदाशिव लोखंडे यांच्याशी संधी साधून एकनिष्ठ राहून, काम करत होते. निवडणुकीत तिकीट नाकारल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून जि.प सदस्य झाले. 
शहाजी राळेभात ग्रामपंचायत काळात मनसेबरोबर काही काळ राहून राष्ट्रवादीत आले, राष्ट्रवादी पक्षाच्या बळावर जि.प सदस्य झाले. नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक राष्ट्रवादीशी न पटल्याने शिवसेनेत प्रवेश केला. मात्र तिथे जास्त काळ जमले नाही. शिवसेनेशी फारकत घेऊन परत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 
प्रा. मधुकर राळेभात हे तालुक्यात सर्वसमावेशक, समविचारी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. मधुकर राळेभात हे मूळ शिवसैनिकच. त्यांचे कुटूंब शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. शिवसेनेच्यावतीने प्रा. मधुकर राळेभात, जि.प सदस्य झाले, अनेक वर्षे तालुकाप्रमुख राहिले. नगरपालिका निवडणूकीनंतर जिल्ह्याच्या वरिष्ठांशी मतभेद झाले, नंतर ते आपल्या काही विश्‍वासू सहकार्‍यांसह राष्ट्रवादीत आले. 
कालपर्यंत दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात यांचा भाजप-सेना पदाधिकारी म्हणून राष्ट्रवादीला कडवा विरोध होता. आज सर्वजण राष्ट्रवादीत असले तरी, आपसात गटबाजी आहेच. तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत शेवटच्या टप्प्यात दत्ता वारे व शहाजी राळेभात असल्याचे समजते. 
पक्षश्रेष्ठींकडे प्रत्येकाची लॉबींग सुरू आहे. मात्र राजेंद्र कोठारी हे मला तालुकाध्यक्ष पद नको म्हणत असले तरी, आतून पक्षश्रेष्ठींकडे असलेले वजन व वरिष्ठ नेत्याकडे असलेले वलय कधी वापरतील हे सांगता येत नाही.