Breaking News

भंडारदरा धरणाच्या पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू

भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी जयपुर (राजस्थान) येथून आलेल्या पर्यटकाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असुन, या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नाशिक येथील एका कंपनीतील तीस युवकांचा समुह भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी गेला होता. या सर्व तीस युवकांनी रात्रभर भोजनाचा व काजव्यांचा आनंद घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी यातील काही अतीउत्साही तरुण अंघोळ करण्यासाठी भंडारदरा धरणात उतरली.

समंत साईराम (वय 21) हा राजस्थान मधील जयपूरचा तरुणसुद्धा पाण्यात उतरला होता. समंतला पाण्यात पोहता येत नसल्याने, तो पाण्यातच गटागंळ्या खाऊ लागल्याने लगेच पाण्यात बुडाला. भंडारदर्‍याच्या एका धाडसी तरुणाने पाण्यात उडी घेऊन तरुणाला पाण्याबाहेर काढले.
धरण काठावर असलेल्या काही तरुणांनी पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पुढील उपचारासाठी राजुर येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात त्यास हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने पुढील उपचारासाठी लोणी येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.