Breaking News

वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज : तांबे



संगमनेर प्रतिनिधी

हल्ली सर्वत्र वाढलेले प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. 

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त नगर परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सप्ताहांतर्गत राबविण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाची नुकतीच सांगता झाली. येथील सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुलाबाहेर वृक्षारोपन करुन नगराध्यक्षा तांबे यांच्या हस्ते हा सांगता सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, सुनंदा दिघे, नितीन अभंग, किशोर पवार, नुरमोहम्मद शेख, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, रघुवीर खेडकर, मधुकर गुंजाळ, आर. बी. सोनवणे, अ‍ॅड. अशोक जोंधळे, ढोले गुरुजी, शैलेश कलंत्री, प्रशांत गुंजाळ, विजय उदावंत, कैलास अभंग, उमेश बोरकर, सुभाष ताजणे, रमेश अभंग, विलास ताजणे, श्रीनिवास पगडाल, वृक्षारोपण विभागाचे सुदाम सातपुते, राजू म्हस्के, उमेश ढोले आदींसह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

नगराध्यक्षा तांबे यांच्या संकल्पनेतून हरित संगमनेर शहरांतर्गत जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने दि. ४ ते ११ जून दरम्यानच्या कालावधीत हे अभियान पार पडले. शहरातील सर्व प्रभागांत नगरसेवक, नगरसेविका व नगरपरिषदेचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या श्रमदानातून टप्प्याटप्याने १० हजार विविध वृक्षांचे रोपण यावेळी करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ प्रभागांमध्ये कर्मचार्‍यांचे पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाद्वारे शहरात सर्वत्र दररोज सकाळी ७ ते ९ यावेळेत वृक्षारोपण करण्यात आले.