Breaking News

शालेय साहित्याच्या खरेदी-विक्रीने बाजारपेठा गजबजल्या

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी चार दिवसांचा अवधी उरला असून, विद्यार्थी तसेच शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाचे वेध लागले आहेत. सुट्टीत मौजमजा करून आनंद लुटणार्‍या कित्येक चिमुकल्या बालकांनाही शाळा सुरु होण्याची चाहुल लागली आहे. मामाच्या गावाला निरोप देत त्यांनी शाळेच्या तयारीला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. कर्जत तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेच्या राशिन, मिरजगाव, कुळधरण, खेड, माहीजळगाव आदी ठिकाणी पुस्तकालये, जनरल स्टोअर्स, क्लॉथ स्टोअर्स, शु मार्केट्समध्ये गर्दी दिसत असुन खरेदीची लगबग सुरू आहे. बाजारपेठेत शालेय साहित्याची खरेदी-विक्री जोरात सुरू असल्याने, बाजारपेठेत शालेय वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारे सुट्टीचा आनंद घेतला. टीव्हीवरील कार्टुनच्या विविध पात्रांनी बालकांच्या मनावर चांगलेच राज्य केले होते. त्यातुन ते आता हळूहळू बाहेर पडु लागले आहेत. त्याचा प्रभाव म्हणून मुलांचा कार्टून्सचे चित्र असलेल्या कंपास, स्कुलबॅग, टिफिन्, वह्या घेण्याकडे कल वाढला आहे. मनासारखे शालेय साहित्य मिळत असल्याने मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार असल्याने, बाजारपेठेत विविध शालेय साहित्याचे आगमन झाले आहे. शाळा सुरू होताच अनेक घरातील टीव्हीचे केबल बंद केले जाते. त्यामुळे बच्चेकंपनीपासून छोटा भीम, चुटकी, कालिया, जग्गु, ढोलू बोलू, राजू, मोटू पटलू, स्पायडरमॅन, मिकी माउस, बेबी डॉल, बॅटमॅन, सुपरमॅन असे विविध प्रकारचे कार्टून्सपासुन दुरावणार आहेत. सध्या वस्तुंच्या खरेदीकडे मुलांचा कल आहे. आठवडे बाजारातुनही मोठ्या प्रमाणावर शालेय साहित्याची विक्री विक्रेते करीत आहेत. यातून बाजारपेठेत शालेय साहित्याची खूप मोठी उलाढाल होत आहे.


आकर्षक डिझाइन्स, कार्टून्सचा प्रभाव
विविध कंपन्यांनी प्रत्येक शालेय वस्तुही आगळीवेगळी बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांना कार्टून्सची जवळीकता असल्याने याही वर्षी शालेय साहित्यांचे उत्पादन करणार्‍या विविध कंपन्यांनी आकर्षक वस्तूंच्या निर्मितीवर कार्टून्सचा प्रभाव ठेवला आहे. मुलांना आकर्षित करण्यासाठी बाजारात लहान-मोठे टिफिन्स, पाण्याच्या बाटल्या, कंपास, स्कूलबॅग्ज आदी वस्तु नवनविन डिझाईन आणि आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध आहेत.शालेय साहित्यावर कार्टून्सचा उपयोग करण्यात आल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे बाजापेठेत बच्चेकंपनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटत असताना दिसत आहेत.


बालकांच्या पसंतीच्या वस्तुंची विक्री
या आठवड्यात शाळा सुरु होत असल्याने, विद्यार्थी तसेच पालकांचा शालेय वस्तुंच्या खरेदीसाठी कल वाढला आहे. सर्व प्रकारचे शालेय साहित्य माफक दरात उपलब्ध असल्याने, या भागातील विद्यार्थी व पालक वर्गांने भक्ती शॉपिंगला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. विद्यार्थ्यांना आवडतील अशा आकर्षक वस्तु ठेवल्याने चिमुकल्या बालकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. वह्या, स्कुलबॅग्ज, युनिफॉर्म याचा सर्वाधिक खप होत आहे.
- शैला सुपेकर 
भक्ती शॉपिंग, कुळधरण