नगरपरिषदेच्या प्लास्टिक बंदी मोहिमेत व्यापाऱ्यांकडून दंड वसूल
।संगमनेर/प्रतिनिधी।
प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यासाठी नगरपलिकेच्यावतीने भरारी पथक नेमण्यात आले. या पथकाने शहरातील सात ते आठ दुकांनदारावर कारवाई केली. यात २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम संगमनेर नगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी अतिक्रमण पथकातील क्रर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्लास्टिकबंदीचा फटका शहरातील राजेंद्र पर्बत (किरकोळ दूध विक्री, नवीन नगर रोड), अपना बाजार (लिंक रोड), बी. एम. स्वीट (नवीन अकोले रोड), कास बेकरी (मालदाड रोड), सोहन लाल चौधरी (बी. एम. स्वीट) या दुकानदारांना बसला. या दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार असे एकूण २० हजार आणि तुषार राठी, गोविंदराज संजय मिसाळ, अंबिका स्वीटस यांना प्रत्येकी १००० असे ५ हजार असा सर्व मिळून २५ हजारांचा दंड नगरपालिकेने वसूल केला.
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर दुकानदार, हॉटेल, भाजीपाला व फळे विक्रेते, भेळ विक्रते, किराणा विक्रेते यांनी जवळ असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या नष्ट कराव्यात. जर कोणी जवळ बाळगताना अगर विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी दिला आहे. तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री कोणीही करू नये, असे आवाहन नगरपरिषदेकडून केले आहे.