‘त्या’ रस्त्याचे काम सुरु ; नागरिकांनी सोडला निःश्वास
राहुरी विशेष प्रतिनिधी
शहरातील पूर्व भागात दळणवळणाचा असलेला रेल्वे स्टेशन नाका नंबर पाच हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय खराब झाला होता. अखेर सार्वनजिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे या भागात येणारया जाणारया नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या रस्त्यावर अनेकवेळा अपघात झाले आहेत. त्याचप्रमाणे सदरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, या मागणीसाठी माजी उपनगरध्यक्ष आर. आर. तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन या रस्त्याचे काम मार्गी लावा, अशी मागणी केली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनेक आश्वासने आणि आंदोलनांचा इशारा दिल्यानंतर अखेर रस्त्याचे काम काल सुरु करण्यात आले.
माजी उपनगरध्यक्ष आर. आर. तनपुरे यांनी या कामाची पाहणी केली. शहराच्या पूर्व भागात जाण्या-येण्यासाठी राहुरी- मांजरी रस्त्यावर कायम वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्कालीन आ. प्रसाद तनपुरे यांच्या कार्यकाळात १५ वर्षांपूर्वी राहुरी ते रेल्वे स्टेशनपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत या रस्त्याचे काम कधीच झालेले नाही.