वाढदिवसानिमित्त कवड्या डोंगरावर वृक्षारोपन
सुपा / प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लावगड करणे महत्वाचे असून, लावलेल्या झाडांचे संवर्धन होणे तितकेच, महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते दादाभाऊ कोल्हे यांनी केले.पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथिल शिक्षक नेते कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कवड्या डोंगरावर विविध प्रकारचे वृक्षारोपन करण्यात आले, यावेळी कोल्हे बोलत होते.
लोणी हवेली गावातील कवड्या डोंगराच्या माथ्यावर सुझलॉन कंपनीचा पवन उर्जा प्रकल्प आहे. त्यामुळे तेथील वन्य प्राणी कवडया डोंगराच्या पायथ्याकडे आले आहेत.डोंगर पायथ्याच्या मध्यभागी लोणी हवेली गावचे ग्रामदैवत महादेव मंदीर आहे. हे जागृत देवस्थान असल्याने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते, नुकतेच महादेव मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.
कवड्या डोंगरावर अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. उन्हाळ्यात त्यांना पाण्याची सोय नव्हती. प्राण्यांना, पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याबाबत लोणी हवेलीचे सरपंच डॉ. शंकर कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, मेजर प्राध्यापक व माजी उपसरपंच संजय कोल्हे, दादाभाऊ कोल्हे, शरद कोल्हे यांनी वन्यप्राण्यांना पाण्याच्या सोयीसाठी वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. शिक्षक नेते दादाभाऊ कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चास फाटा देत गावातील श्रीकृष्ण मंदिर व महादेव मंदिराच्या भोवती वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी भाऊसाहेब जगताप, किसन दुधाडे, पोपट दुधाडे, अनिल कोल्हे, सुभाष कोल्हे, शंभू दुधाडे, छत्रुघ्न नवघणे, ग्रामसेवक सुनिल दुधाडे, युवराज जगताप, निलेश जगताप, सागर हिंगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.