Breaking News

चौंडी घटनेची चौकशी करून, खोटे गुन्हे त्वरीत मागे घ्या!


मिरजगांव / प्रतिनिधी : चौडी येथे पुण्यश्‍लोक आहील्याबाई होळकर यांच्या जयंती दिवशी धनगर समाजाच्या लोकांनी आरक्षणाची मागणी करणे गुन्हा आहे का? असा सवाल कर्जत युवक काँग्रेसचे दादासाहेब सोनमाळी
मिरजगाव येथे शुक्रवारी बहुजन क्रांती आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी, नगर सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको करण्यात आला. चौडी येथे पुण्यश्‍लोक आहील्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जयंतीनिमित्त राज्यभरातुन धनगर समाज बांधव पुण्यश्‍लोक अहील्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आले असता, येथे सुरू असलेल्या अभिवादन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते डॉ. इंद्रकुमार भिसेंसह काही समाज बांधवांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा करत घोषणा दिल्या असता, धनगर समाजातील कार्यकर्त्यांवर भा.दं.स. कलम 307 व 353 असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते तात्काळ मागे घेण्यात येण्यासाठी बहुजन क्रांती आंदोलन सुरू असुन, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील, युवक काँग्रेसचे दादासाहेब सोनमाळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळुंखेंसह मिरजगांव येथील आदीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन दळवी, कुलदीप गंगावणे, सलिम आतार, आर.पी.आय. शहराध्यक्ष विशाल घोडके, प्रहार संघटनेचे राजेंद्र गोरे, सादीक शेख, अंकुश भैलुमे, गोदड समुद्र, भगवान घोडके, सविता सुद्रीक, शब्बीर पठाण, सोमनाथ भैलुमे, सय्यद काटेमापवालेंसह बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोनमाळी म्हणाले की, चौंडी येथील पुण्यश्‍लोक आहील्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा शासकीय न होता केवळ जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे यांचाच होता.पालकमंत्री हे सूडबुद्धीने राजकारण करत आहेत, म्हणूनच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताच, त्यांच्या सागण्यावरुच समाज बाधवांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी बाळासाहेब साळुंखे म्हणाले की, आरक्षण मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांवर दगडफेक करणारे, हे पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते होते. त्यांना हा मुद्दा दडपून टाकण्यासाठी हा उद्योग केला. तर यावेळी किरण पाटील म्हणाले की, ज्यांनी मंत्री महोदयांसाठी मतदान मागितले त्याच लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे. यांना घटनेचे व लोकशाही मार्गाने चालायचे नाही म्हणून, लोकांनी काही मागणी केली की दंडशाहीने दडपून टाकण्याचे काम करतात. यावेळी सविता सुद्रीक, गोदड समुद्र, राजेंद्र गोरे, सोमनाथ भैलुमे, भगवान घोडके यांची भाषणे झाली, तर कर्जत पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक वैभव महांगरे यांनी चोख बंदोबस्त दिला. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको व बहुजन क्रांती आंदोलनास पाठिंबा देण्यात आल्याचे निवेदन पत्र प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून महसूल विभागाचे मोहसीन शेख व कर्जत पोलिस उप-निरीक्षक वैभव महांगरे यांनी स्विकारले.