Breaking News

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार - प्रा. नितिन बानुगडे -पाटील


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अधिपत्याखाली पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे. तसेच सातारा जिह्यातही भगवा फडकणार आहे. असा ठाम आत्मविश्‍वास शिवसेना उपप्रमुख आणि सातारा सांगलीचे संपर्कप्रमुख प्रा. नितिन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केला. संपर्क अभियानांतर्गत आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाई विधानसभा मतदार संघ आणि कोरेगांव विधानसभा मतदार संघ यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करण्याकरिता वाई येथील शिवसेना भवनमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
शिवसेना पूर्णपणे स्वबळावरच निवडणुका लढविणार असून आमची कोणाशीही युती रहाणार नाही. भाजपच्या कारभाराला जनता आता 4 वर्षातच कंटाळली असून त्यांनी अत्यंत चुकीचे निर्णय घेवून सत्ता राबविली आहे. देशपातळीवरचा विचार केला तर 2014 साली भाजपा बरोबर गेलेले बरेच प्रादेशिक पक्ष आता आपला पाठिंबा काढून घेत आहेत. मात्र शिवसेनेला जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावयाची आहे म्हणून सत्तेत राहून आम्ही प्रसंगी न पटलेल्या निर्णयांच्या विरोधात उभे ठाकले आहोत. महाराष्ट्राचा विचार करता शिवसेना ही आता महाराष्ट्राची गरज झाली आहे. 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँगेस राष्ट्रवादी सरकारला जनतेने नाकारले आणि आता सत्तेत असलेल्या भाजपावर जनता नाराज आहे.
शिवसेना सातत्याने शेतक-यांच्या प्रश्‍नांच्या बाजूने उभी राहिली असून कर्जमाफी करण्यास आम्ही शासनाला भाग पाडले आहे. पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेला विरोध केला आहे. नोटाबंदी जीएसटी याबाबतीत हि विरोध केला आहे. महाराष्ट्राचा एकंदर दौरा करता शिवसेनेचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्राला शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे जनतेला पटले असल्याने भावी मुख्यमंत्री आणि शासन स्वबळावर शिवसेनेचेच असणार आहे, असेही प्रा. बानुगडे पाटील यांनी सांगितले. सध्या शिवसैनिकांची मते जाणून घेवून ज्या त्या मतदारसंघात कर्तव्यदक्ष, पारदर्शक ता ठेवणारा कार्यकर्ता पाहून आमदारकीसाठी संधी दिली जाईल. स्थानिक कार्यकर्त्यांमधून निवड करुन उमेदवार ठरविला जाईल एवढ्या महिन्याभरात दौरा संपले नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उमेदवार जाहीर करु. ज्या योगे उमेदवाराचे नाव, त्यांचे कार्य आणि शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसैनिक घराघरांत शिवसेनेला पोहोचली.
सातारा जिह्यांतही चांगल्या प्रकारचे यश शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्‍वास त्यांनी वाई आणि कोरेगांव मतदार संघातील कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला आणि दीपप्रज्वलन करुन कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.