तोलामोलाचा शिक्षक प्रतिनिधी निवडून देण्याकडे मतदार गुरूजनांचा कल
नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणूकीतील उमेदवारी छाननीचा टप्पा पुर्ण झाल्यानंतर एकूण तेवीस उमेदवार सध्या रिंगणात दिसत आहेत. तथापी सोमवार दि. 11 जुन रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रमुख पाच उमेदवारांमध्ये या मतदार संघावर अधिकार आणि हक्क सांगणार्या टिडीएफच्या उमेदवारीला मिळत असलेला पाठींबा लक्षात घेता विजयाचा दावा करणार्या अन्य प्रमुख उमेदवारांसमोर प्रा. संदीप बेडसे यांचे आव्हान उभे राहीले आहे.
प्रशासकीय सेवेचा तब्बल नऊ वर्षाचा मंत्रालयीन अनुभव या निवडणूकीत जमेची बाजू मानली जात असून स्वेच्छा निवृत्तीनंतर गेली तीन वर्ष उत्तर महाराष्ट्रात निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क बेरजेचे समिकरण ठरणार असे भाकीत वर्तवले जात आहे.
किती उमेदवार प्रत्यक्ष लढतीत असतील याचा निर्णय होण्याआधी प्रचाराच्या दोन फेर्या पुर्ण केलेले प्रा. संदीप बेडसे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे इंडिपेंडन्ट सेंकडरी अँड हायर सेंकडरी टिचर्स युनियननेही पाठींबा दर्शवला आहे. युनियनचे अध्यक्ष रोहीत गांगुर्डे, कार्याध्यक्ष सूर्यभान जगताप आणि सेक्रेटरी किशोर शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पाठींबा पत्र यापुर्वीच दिले गेले आहे.
या निवडणूकीत मतदान करणारा वर्ग हा उच्च विद्याविभूषीत आणि वैचारिक असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधीही त्याच तोलामोलाचा निवडून देण्याच्या दिशेने प्रचाराची पावले पडत आहेत. एकूणच या निवडणूकीत उमेदवारांच्या वैचारिक आणि बौध्दिक क्षमतेचाही मतदार विचार करीत असल्याची प्रचिती प्रचारा दरम्यान येत आहे.