Breaking News

मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र ; माओवाद्यांचा होता पंतप्रधानांच्या हत्येचा कट

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 धमकीची पत्रे आली आहेत. या माहितीला गृह विभागाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला असून याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले होते. यासंदर्भात ही पत्रे असून मारले गेलेल्यांचा बदला आम्ही घेऊ, असा तपशील या पत्रात असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट माओवाद्यांनी आखला होता, अशी माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नक्षलवाद्यांकडून आलेल्या या पत्रांमध्ये केवळ मुख्यमंत्रीच नाही तर त्यांचे कुटुंबीय आणि गडचिरोलीतल्या कारवाईत सहभाग असलेल्या अधिकार्‍यांनाही धडा शिकवू, असे म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र आल्यानंतर गृह विभागाने या पत्रांची चौकशी सुरू केली असून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.आम्हाला ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकत नाही. मार्क्सच्या विचारांनी आम्ही आमची चळवळ सुरुच ठेवली असल्याची धमकी, या पत्रात देण्यात आली आहे. ही पत्रे कुठून आली, कधी पोस्ट केली गेली आणि कुणी पाठवली, याचा तपास गृह विभाग करत आहे. कोरेगाव-भीमा घटनेप्रकरणी नक्षलसमर्थक असल्याच्या आरोपाखाली चौघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवरही काही हिंसक कारवाया होऊ नयेत, यासाठीदेखील गृह विभाग प्रयत्नशील असल्याचे गृहविभागाने  स्पष्ट केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ऐटापल्लीच्या ताडगाव-कसनूर, बोरिया जंगलात सुरक्षादलाने नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 34 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. 22 एप्रिल रोजी सी-60 पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती. बोरिया जंगलात 16 नक्षल्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळाजवळ इंद्रावती नदीमध्ये आणखी 11 मृतदेह सापडले होते. तसेच राजाराम खांदला परिसरातील चकमकीतही 6 नक्षल्यांना ठार करण्यात आले होते अन्य एका क ारवाईमध्ये 1 नक्षलवादी ठार करण्यात आला होता. अशा प्रकारे एकूण 34 नक्षलवादी ठार करण्यात आले होते. याच चकमकीचा या धमकी पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
माओवाद्यांचा कट
पुणे पोलिसांनी शुक्रवारी माओवाद्यांचा पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा अत्यंत खळबळजनक कट उधळला आहे. पोलिसांनी माओवाद्यांचा खासगी संवाद पकडला असून त्यात ही बाब उघड झाली. यात पंतप्रधान मोदी यांची राजीव गांधीप्रमाणे हत्या करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 5 पैकी एका व्यक्तीच्या घरू न एक पत्र जप्त केले आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांची राजीव गांधींप्रमाणे हत्या करण्याचा त्यांचा कट समोर आला. या 5 आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे, की आपल्याकडे देशात याचा तपास करण्यासाठी गुप्तहेर संस्था आणि सुरक्षा दल आहेत. ते याचा शोध घेतील.