Breaking News

‘हे परमेश्वरा! जिल्ह्यात दमदार पाऊस होऊ दे’ संवत्सरला महाविष्णू याग



कोेपरगांव शहर प्रतिनिधी

तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथे असलेल्या शृंगेश्वर मंदिरात अधिक मास अर्थात धोंडयाच्या महिन्यानिमित्त महाविष्णू याग करण्यात आला. ‘चांगला पाऊस होऊ दे’ अशी या प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी येथील २० जोडप्यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली. कार्यक्रमाचे पौरोहित्य ग्रामस्थ पुरोहित शैलेश जोशी, संतोष गोरे, हेरंब जोशी, अक्षय जोशी, सचिन हेलोडे यांनी केले. गेल्या २९ वर्षांपासून हे बाळासाहेब खर्डे यांच्यासह २१ भक्त भगवान शृंगेश्वराला दर सोमवारी रूद्राभिषेक करतात. त्याचेही उद्यापन यावेळी करण्यात आले.

श्रीक्षेत्र संवत्सर येथे पुरातन काळापासून विभांडक ऋषींचा मुलगा शृंगेश्वर यांचा आश्रम आहे. रोमचरण राजाच्या राज्यात १२ वर्षे दुष्काळ पडला होता. तेंव्हा राजाने हे संकट कसे दूर होईल, असे विचारले असता शृंगऋषींना आणल्यावरच ते दूर होईल, असे सांगितले होते. संवत्सर हा परिसर पूर्वी दंडकारण्यमय होता. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या १४ वर्षे वनवासाचा काही काळ येथे व्यतित केला. अयोध्येचा राजा दशरथ याला पुत्रप्राप्ती होण्यासाठी शृंगऋशींच्या हस्ते पुत्रकामेश्टी यज्ञ झाल्यावरच दशरथ राजाला पुत्र प्राप्त होईल, अशी भविष्यवाणी झाली होती. त्याप्रमाणे राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. हा यज्ञ पाहण्यांसाठी अनेक राजे उपस्थित होते. त्यांच्याबरोबरच वामदेव, जबाली, शातातप, संजय, वसिश्ठ, कश्यप , कौंडीण्य, कण्व, गौरमुख, पाराशर, बकदाल्भ्य, शतानंद, सुमंतु, सौभरी, वेदविद, गाग्र्य, मार्कडेंय, नारद, व कौषिक आदी ऋषी उपस्थित होते. तेंव्हापासून हे स्थान अत्यंत पवित्र असून नागपुर-मुंबई द्रुतगती मार्गावरील अनेक भाविक येथे दर्शनास येतात. शृंगेश्वर मंदिरात महादेव पिंड स्थापित असून मंदिराचा जीर्णोध्दार योगी रामदासीबाबा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व जंगलीदास माऊली यांच्या हस्ते झाले. त्यानंतर १९८९ सालापासून आजतागायत २१ जोडप्यांनी रूद्राभिषेक दर सोमवारी केलेला आहे. त्यानिमित्त हा महाविष्णू याग होम हवनाचा संकल्प करण्यात आला होता. शृंगेश्वर मंदिर कार्यस्थळावर प्रथमच विष्णुयाग आणि पर्जन्ययाग हे दोन्ही याग पार पडले. यानिमित्त महाप्रसाद वाटण्यात आला. अधिक मासानिमीत्त अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.