सौभाग्याच्या धण्यासाठी सुवासिनींचे वडाला साकडे
कुळधरण / प्रतिनिधी ।
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस, सर्वत्र वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. कर्जत तालुक्यातील विविध भागात वडाच्या झाडाला, मंदिरात तसेच घरी वडाची फांदी आणून तिचे पूजन करण्यात आले. सुवासिनिंनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील जन्मी हाच पती लाभावा असे मागणे वटवृक्षाकडे मागितले.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीसाठी, वटवृक्षाला सात फेर्या मारतात. त्याला सूत गुंडाळले जाते. पुराणातील कथेप्रमाणे सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले होते. या कथेचे स्मरण करुन वटवृक्षाची पूजा करुन सौभाग्य मागण्याचा हा दिवस उत्साहात साजरा झाला. कर्जत तालुक्यातील सुवासिनिंनी सौभाग्याच्या धन्याला दिर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली.
वटपौर्णिमेच्या सणामुळे महिला शृंगार करून वडाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या. सुवासिनिंनी पाच फळे वडाच्या झाडाजवळ अर्पण केली. वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारून आणि सूत गंडाळून मनोभावे वटवृक्षाची पूजा केली.
कुळधरण येथे जगदंबा मंदीरासमोरील वडाची सुवासिनिंनी पूजा केली. राशिन येथे जगदंबा मंदिर, नागेश्वर मंदिर, जगदंबा हौसिंग सोसायटी तसेच इतर ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. खेडला बाजारतळ येथील वडाची महिलांनी मनोभावे पूजा केली. धालवडी, तळवडी, कोपर्डी, दुरगाव आदी भागात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.