जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचे जिल्हा परिषदेत धरणे
राज्यभरातील सर्व प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया मे 2018 मध्ये राबवण्यात आलेली आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दि.28 मे रोजी करण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर खोटे पुरावे सादर करून बदल्या करून घेतल्या. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 620 शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यांना आता केवळ गैरसोयीचे व अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक आहेत. हे विस्थापित शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली असून, या शिक्षकांवर मोठा अन्याय झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे विस्थापितांमध्ये 70 टक्के महिलांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संवर्ग 1 मध्ये बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या शिक्षकांची कसलीही पडताळणी न करता केवळ शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तरी संवर्ग 1 मधील अपंग शिक्षक व दुर्धर आजारी शिक्षक यांची सक्षम वैद्यकीय अधिकार्यांमार्फत तपासणी करून त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी व्हावी. बर्याच संवर्ग 1 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांनी अपंगांच्या खोट्या प्रमाणपत्राचा आधार घेतला आहे. तर काही शिक्षकांनी आजारी नसताना दुर्धर आजारी असल्याचे खोटे नमूद करून सवलत घेतली आहे. या सर्वांची वस्तुनिष्ठ चौकशी करावी. तसेच संवर्ग दोन मध्ये बदलीसाठी पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेतलेल्या अनेक शिक्षकांची चुकीची अंतरे दाखवून बदली करून दुसर्या शिक्षकाला विस्थापित केले आहे. या सर्व शिक्षकांनी दाखवलेली अंतरे गुगल मॅपद्वारे पडताळून पहावी. संवर्ग दोन मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदारापासून 30 किमीच्या अंतरातील शाळा घेणे अपेक्षित होते. पण बरेच शिक्षकांनी 30 किमी च्या बाहेरील शाळा घेवून इतर शिक्षकांना विस्थापित केले आहे. तरी संवर्ग दोन मधील सर्वांचीच पडताळणी करण्याची मागणी जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांनी केली आहे. तर संवर्ग दोन मधील काही शिक्षकांनी आपला जोडीदार शासनमान्य सेवेत नसताना देखील संवर्ग दोनची सवलत घेऊन आपली बदली करून घेतली आहेत. अशा शिक्षकांची देखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या एक वर्षाच्या आत आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यातून बदलून आलेले शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बदली अर्ज न करण्याचे शासनाचे आदेश आहे. तरी अशा शिक्षकांनी बदली अर्ज भरुन आपली बदली करून घेतली आहे. अशा परिस्थितीत बदली ठिकाणी ते हजर झाले आहेत. याची चौकशी करुन सदर शिक्षकांची बदली रद्द करुन त्यांच्यावर कारवाई करावी. बदली प्रक्रियेत फसवणुक करणार्या बोगस लाभार्थींवर कारवाई करुन त्यांना दुर्गम भागात टाकावे व त्यांनी बळकावलेल्या जागा विस्थापित शिक्षकांना उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात नारायण पिसे, संजय धामणे, विजय नरवडे, संभाजी जाधव, श्रीकांत गायकवाड ज्ञानेश्वर सोनवणे, मेघाली बच्छाव, अर्चना ठाणगे, सविता वराडे, सविता देशमुख, वैशाली गुंड आदींसह जिल्ह्यातील विस्थापित शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.