Breaking News

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन


अहमदनगर (प्रतिनिधी)- मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची रविवार दि.10 जून रोजी शहरात सभा होत असताना रिपब्लीकन पक्षातील सर्व गट व आंबेडकरवादी विविध संघटनांच्या वतीने भिडे गुरुजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सभास्थळी एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लीकन पक्षातील सर्व गट व आंबेडकरवादी विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एल्गार मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. प्रशासनाने सभेला परवानगी देवू नये, अन्यथा सभे स्थळी मोर्चाने जावून, कार्यकर्ते भिडे गुरुजींना पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचा निर्धार बैठकित व्यक्त करण्यात आला. बैठकिनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात येवून एल्गार मोर्चाला परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन सहा. पोलिस अधिक्षक (शहर) अक्षय शिंदे यांना दिले. यावेळी अशोक गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, अमित काळे, विनोद भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, दिपक पाटोळे, नाना पोटोळे, संदिप वाघमारे, विशाल गायकवाड, सुशांत म्हस्के, संजय कांबळे, समीर भिंगारदिवे, सुभाष आल्हाट, सिध्दांत वाघचौरे, भाऊ साळवे, पवन भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, अ‍ॅड.संदिप पाखरे, अ‍ॅड.संतोष गायकवाड, अनुसय्या भाकरे, लता जाधव आदि उपस्थित होते.
भिमा कोरेगाव येथील दंगलीत मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल असून, अद्यापि त्यांना अटक करण्यात आलेली नाही. फरार आरोपी असून ते पोलिस संरक्षणात विविध जिल्ह्यात सभा घेत आहे. भिडे गुरुजी सभा घेवून दलित मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करीत असून, राज्यघटनेच्या विरोधात वक्तव्य करुन घटनेची पायमल्ली करत आहे. त्यामुळे समाजात द्वेष पसरत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. भिमा कोरगाव प्रकरणात निष्पाप आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक करण्याचे सत्र सुरु असून, गुन्हा दाखल असलेले आरोपी मोकाट फिरुन पोलिसांच्या बंदोबस्तात सभा घेत असून, या भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रविवारी टिळक रोड येथे पटेल मंगल कार्यालयात होणार्‍या सभेच्या ठिकाणी रिपब्लीकन पक्षाचे विविध गट, आंबेडकरवादी संघटना एल्गार मोर्चा काढून भिडे गुरुजी यांना अटक करण्याची मागणी करणार आहेत. तर त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.