Breaking News

अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई


आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वी - दाढ रस्त्यावरुन अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर आश्वी बुद्रुकचे कामगार तलाठी अमोल गडाख यांनी कारवाई केली. अंधाराचा फायदा घेत वाळूतस्कर कामगार तलाठ्याला गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आश्वी- दाढ रस्त्यावर कामगार तलाठी अमोल गडाख यांना रविवारी टाटा २०७ वाहन सशंयास्पदरित्या रस्त्यावर उभी दिसली. त्यावेळी तलाठी अमोल गडाख व कोतवाल संदीप तांबे यांनी जवळ जाऊन पाहिले असता तर त्या वाहनामध्ये अवैधरित्या भरुन चालवलेली वाळू दिसून आली. त्यामुळे गडाख हे गाडीच्या चालकाला विचारणा करण्यासाठी गेल्यानतंर त्याठिकाणी असलेले तीन ते चार जण तेथून पळून गेले. तर गडाख यांनी चालकाला सदर वाहन पोलिस स्टेशनला घे, असे म्हणताच चालकाने गाडी घेऊन आश्वी खुर्दच्या दिशेने पलायन केले. त्यामुळे कामगार तलाठी अमोल गडाख यांनी आश्वी पोलिस ठाण्यात आरोपी अक्षय कहार व तुषार सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुसरीकडे गोर-गरीब नागरिकांना घरकुल आणि शौचालय बांधणीसाठी वाळू मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कामे बंद आहेत. नागरिकांना वाळू तस्कराकडून मनमानी भावात वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासन हे जनतेसाठी की वाळूतस्कांरासाठी, असा प्रश्न येथील नागरीक विचारत आहेत.