Breaking News

‘सात’ फे-यांत ‘सात’ तोळे सोने लंपास


कोल्हार प्रतिनिधी
वटपौर्णिमेचा सण ‘चैन स्नॅचिंग’ करणा-या चोरट्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला. कोल्हार आणि बाभळेश्वर येथे वटपौर्णिमेनिमित्त ‘सात फेरे’ घालून घरी परतणा-या महिलांच्या अंगावरील सुमारे ७ तोळे सोन्यावर चोरट्यांनी हात साफ केला.वटपौर्णिमेला नटून थटून दागिने घालून पूजा करण्याचा अट्टाहास या दोन महिलांना चांगलाच महागात पडला. मनीषा शाम कापसे { रा. कोल्हार } सोनगांव रोडने घरी परतत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या अंगावरील सुमारे ९५ हजार रुपये किमती चार तोळ्यांचे गंठण हिसकावून नेले. येथील भगवतीमाता मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये सदर चोरटे कैद झाले आहेत.

दुसरी घटना बाभळेश्वर येथील म्हसोबा मंदिरालगत असणा-या दूध डेअरी जवळ घडली. यामध्ये मनीषा स्वप्नील लोळगे { रा. बाभळेश्वर } या महिलेच्या गळ्यातील सुमारे ८९ हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. सदर घटना साडेबाराच्या सुमार घडली. विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील दुचाकीवरून आलेले चोरटे एकच असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाबत लोणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.