Breaking News

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कास्ट्राईबच्या पदाधिकार्‍यांची बैठक विविध प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन


अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची नुकतीच बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गतच्या विविध विभागाचे कर्मचारी संबंधित संवेदनशील प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. कास्ट्राईबच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध प्रश्‍नांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ते सोडविण्याचे आश्‍वासन दिले.
या बैठकित अंशदायी कर्मचार्‍यांचे डीसीपीएसच्या रक्कम वेतनातून ज्या प्रमाणात कपात करण्यात आल्या आहेत. त्या प्रमाणात शासन हिस्सा जमा नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सन 2005 पासून नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांना शासन हिस्सा जमा करण्यासाठी विशेष शिबीर घेवून तातडीने रक्कमा जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. सदर कर्मचार्‍यांच्या कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी रकमा जिल्हा परिषदेकडे पडून आहेत. त्या तात्काळ जमा करण्याचे निदेर्श संबंधित खातेप्रमुखांना त्यांनी दिले. तसेच मैल कामगार यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत असताना ते तात्काळ देण्यासाठी संबंधित खातेप्रमुख कार्यकारी अभियंता आंधळे यांना कास्ट्राईबच्या पदाधिकार्‍यांनी धारेवर धरले. इतर विभागातील भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेतनातून कपात होऊनही गायब झाल्याचे कास्ट्राईब महासंघाने निदर्शनास आणून दिले. त्याबाबत चौकशीचे आदेश तर निलंबित कर्मचारी यांचा कार्यकाळ पूर्ण होवून, डीई पुर्ण झाले असल्यास त्याच्या पुन:स्थापनेची कार्यवाही तातडीने करण्याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना केल्या.
लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यक लेखा यांना ग्रेड पे 2400 ऐवजी 2800 देण्याबाबत उच्च न्यायालयाचा निकाल सन 2014 ला लागला असून, त्यांनी त्या निर्देशाने ग्रेड वेतन शासनाच्या मान्यता घेऊन तातडीने देण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एनआरएचएस परिचारिकांना विशेष वेतनाबरोबर प्रवास भत्ता आणि शिवणकाम पाहणार्‍यांना विशेष वेतन, सेवा ज्येष्ठतेनुसार बिंदुनामावली प्रमाणे नियुक्ती आदेश देण्याबाबत, सेवेचा कालावधी लक्षात घेऊन वेतन वाढ, कंत्राटी परिचारिकांना रिक्त पदाच्या पद भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्याबाबत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श कर्मचारी पुरस्कार जिल्हा परिषदेकडून देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित आरोग्य अधिकारी यांना सुचविले. सदर बैठकीस कास्ट्राईब महासंघाचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, महासचिव निवृत्ती आरू, ना.म. साठे, सुहास धीवर, गुलाबराव जावळे, मायाताई जाधव, उज्वला गायकवाड, सयाजी खरात, संजय घोडके, दिपू कसबे, गुणवंत खुरंगळे आदी उपस्थित होते.