Breaking News

यवतमाळ हजारो क्विंटल शेतमाल उघडीरिप

यवतमाळ, दि. 13, जून - यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून शेतक-यांचा सुमारे 50 हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर पडून आहे. यादरम्यान झालेल्या पावसामुळे हरभरा आणि तूर ओली होऊन त्याला कोंब फुटू लागली आहेत. 

जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आत्तापर्यंत 31 हजार क्विंटल तूर आणि 21 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र गोदामात जागा नसल्याने हा शेतमाल बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर पडून आहे. हा शेतमाल गोदामात ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे शेतमाल ओला होत आहे. आधीचाच शेतमाल उघड्यावर असल्याने नव्याने खरेदीसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर हरभरा खरेदी करायचा कसा, असा प्रश्‍न केंद्रांपुढे निर्माण झाला आहे. हमी केंद्रांवर खरेदीच्या वाढीव मुदतीचे पत्र धडकल्यानंतरही हरभर्‍याची खरेदीच सुरू झाली नाही. परिणामी आर्णी केंद्रावर उघड्यावर असलेल्या तुरी पाण्यात सापडल्या. आता त्यांना कोंबे फुटत आहे. जिल्ह्यात 15 मार्चपासून 29 मे पर्यंत केवळ 3 हजार 398 शेतकर्‍यांचा 45 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील 12 हमी केंद्रांवर 12 हजार 898 शेतकर्‍यांनी नोंद केली होती. त्यापैकी तीन हजार 398 शेतकर्‍यांना हरभरा विकता आला. तर 9 हजार शेतकरी अद्यापही विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्याकडे 2 लाख क्विंटल हरभरा बाकी आहे. हा हरभरा 13 जूनपर्यंत खरेदी करण्याच्या सूचना आहेत. दरम्यान, पाऊस आल्याने अनेक केंद्रांना खरेदी सुरू करता आली नाही. विक्रीस आलेला हरभरा ठेवण्यासाठी गोदामही शिल्लक नाही. यामुळे हरभरा उघड्यावर पडून आहे.