दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी गृहसचिवांसह सीबीआयला न्यायालयाचे समन्स
मुंबई - डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांचे काम कुचकामी ठरत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांवर ओढले आहेत. या प्रकरणी राज्याचे गृह सचिव आणि सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर या दोघांनाही मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येसंदर्भातील तपास कामाचा खुलासाही सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यामध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात 20 फेब्रुवारी 2015 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर स्थानिक तपास यंत्रणांना अद्यापही आरोपींचा शोध घेण्यास यश आले नाही. त्यानंतर या हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. मात्र, सीबीआयही या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेली नाही. या दोन्ही हत्येच्या तपासाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने तपासयंत्रणांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणी 12 जुलैला पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.