Breaking News

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांना तणावमुक्तीसाठी हास्ययोगाचे धडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात तणाव मुक्तीसाठी हास्ययोगाचे धडे देवून, शायरीतून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. तर विविध बौध्दिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शकुंतलाजी शेटीया उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. मनिषा गुगळे व रुपा शहा यांनी उपस्थित महिलांना तणावमुक्ती व आनंदी राहण्यासाठी हास्ययोगाचे महत्त्व सांगितले. तर निरोगी आरोग्यासाठी हास्ययोग सर्वोत्तम ठरत आहे. शरीर व मनाचे आरोग्य चांगले तर जीवन आनंदी राहते. महिला घरातील अनेक कारणांनी तणावपुर्ण वातावरणात वावरत असतात. जीवनात हसणे कमी झाल्याने अनेक व्याधी वाढल्या आहेत. स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ देण्याचे त्यांनी महिलांना आवाहन केले. तर हास्ययोगाचे विविध प्रात्यक्षिकाद्वारे महिलांना खिळखिळून हसविले.
डॉ.कमर सुरुर यांनी आपल्या शायरीतून स्त्री शक्तीचा जागर केला. समाजातील स्त्री चे महत्त्व, महिलांना सन्मान व आदर संदर्भात शायरी सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. संस्कृती वाघस्कर या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच वडिल या विषयावर भाषण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महिलांसाठी काडीपेटी डबीत जास्तीत जास्त वस्तू भरण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुमन कांबळे व उषा ओझा प्रथम ठरल्या.तर द्वितीय- ज्योती कोतकर, शारदा नहार, तृतीय- सुवर्णा नागोरी, पुष्पा मालू तर उत्तेजनार्थ सोनल परमार, शैलजा ससाणे, ताराबाई लढ्ढा, शोभा कोठारी यांनी बक्षिसे मिळवली. या विजेत्यांना शकुंतलाजी कटारिया यांच्या हस्ते बक्षिससे देण्यात आली. यावेळी मनिषा गुगळे, डॉ.कमर सुरुर, रुपा शहा, प्रयासच्या अध्यक्षा अलका मुंदडा, कुसुमसिंग, दिपा राज, शिला गुगळे, पुष्पलता कटारिया, अपेक्षा संकलेचा, डॉ.मंगल सुपेकर, मनिषा देवकर, मधू बोरा, दिपा मालू आदि उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अपेक्षा संकलेचा यांनी केले. आभार डॉ.मंगल सुपेकर यांनी मानले.