Breaking News

लोकप्रतिनिधींना खुर्चीतून पायउतार करण्यासाठी भाकरी फिरवा 2019 मंत्राचा वापर करण्याचे जाहिर

अहमदनगर (प्रतिनिधी)- निळवंडे धरणाच्या कालव्यांना निधी देण्यास मान्यता मिळाली आहे. हा निधी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्षमता व खा.सदाशिव लोखंडे यांच्या पाठपुराव्याने मिळाला आहे. दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या निधीने निळवंडे कालव्याचे काम मार्गी लागणार आहे. या कामातून नितीन गडकरी यांच्या कार्यक्षमतेची प्रचिती सर्वसामान्यांना आली असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. तर येथील लोकप्रतिनिंधींनी राजकारणाच्या कुटील डावाने या भागातील दोन पिढ्यांना पाटपाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत त्यांना खुर्चीतून पायउतार करण्यासाठी भाकरी फिरवा 2019 मंत्राचा वापर करण्याचे जाहिर करण्यात आले.
निळवंडेच्या लाभ क्षेत्रात 182 गावे आहेत. दोन पिढ्यापासून या गावचे सर्वसामान्य ग्रामस्थ हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ.बाळासाहेब थोरात व मा.आ. मधुकरराव पिचड यांच्या अकार्यक्षमता व कुटील कारस्थानामुळे पाण्या अभावी यमयातना येथील नागरिकांना सोसाव्या लागल्या. या दिग्गज राजकारण्यांनी आपले किल्ले शाबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या झुंजी लावण्यापलीकडे काहीच काम केले नाही. यांनी सत्तेची फळे चाखली मात्र सर्वसामान्यांची कामे केले नसल्याचा आरोप अ‍ॅड.गवळी यांनी केला आहे.
निळवंडे कालव्याचे काम होण्यासाठी खा.सदाशिव लोखंडे यांनी निधी मिळण्यास मोठे प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून, चार वर्षातील हे त्यांचे सर्वात मोठे अधोरेखित करणारे कार्य ठरले आहे. पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने लोखंडे यांना निळवंडे कालवा महारथी घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. निळवंडे कालव्याचे काम होण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून गंगाधर गमे, बाळासाहेब वर्पे, नानासाहेब शेळके, सुखलाल गांगवे, उत्तम घोरपडे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, विठ्ठल घोरपडे, भाऊसाहेब शिंदे आदींनी मोठे प्रयत्न केले. मिळालेल्या निधीमुळे लवकरच या कालव्याचे काम होवून वंचित गावांना पाणी मिळणार आहे. हे काम पुर्णत्वास नेण्यासाठी निळवंडे कालवा समितीच्या सदस्यांसह कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, भिमराज चत्तर प्रयत्नशील आहे. कामे न करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात 2019 च्या निवडणुकीत भाकरी फिरवा या मंत्राचा उपयोग करुन त्यांना खुर्चीवरुन पायउतार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.