Breaking News

आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स:आशिषला सुवर्ण तर पूनमला ब्राँझ


गिफू वृत्तसंस्था

आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी पाच पदकांची कमाई केली. एका सुवर्णपदकासह इतर चार पदकांचा यात समावेश आहे. यात हातोडा फेकमध्ये आशिष जाखरने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळवले.

आशिषने २०१६च्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते. त्याने हातोडा फेकमध्ये ७६.८६ मीटर कामगिरी नोंदवली. याचबरोबर आपला ७५.०४ मीटरचा मागील विक्रम मोडला. ही कामगिरी त्याने एप्रिलमध्ये ज्युनिअर फेडरेशन कपमध्ये नोंदवली होती. आशिषने पहिल्या प्रयत्नात ७४.९७ मीटर लांब हातोडा फेक केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात राष्ट्रीय विक्रम रचला. दमनीतसिंगने ७४.०८ मीटर कामगिरीसह रौप्यपदक मिळवले. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याची पूर्वीची सर्वोत्तम कामगीरी ७०.३७ मीटर होती. दमनीतने २०१७च्या जागतिक युवा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने ब्राँझपदक मिळवले. तिने १७ मिनिटे ३.७५ सेकंद वेळ नोंदवली. २०१६च्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेत पूनमला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. जपानच्या मिकुनी यादाने (१६ मि. ३१.६५ से.) सुवर्ण, तर चीनच्या लिहुआ नियूने (१६ मि. ५५.५४ से.) रौप्यपदक मिळवले. महिलांच्या तिहेरी उडीत प्रियदर्शनी सुरेश हिने ब्राँझपदकाची कमाई केली. तिने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात १३.०८ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. व्हिएतनामच्या वू थि न्गॉकने १३.२२ मीटर, अशा कामगिरीसह सुवर्ण, तर चीनच्या युकी पानने १३.२१ मीटर कामगिरीसह रौप्यपदक मिळवले.