Breaking News

सुपा परिसरात गारांसह पावसाची जोरदार हजेरी


सुपा / प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील जिरायती पट्यात शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह गाराच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या.सुपा येथिल पारनेर रोडनजीक असलेल्या गटारिचे पाणी तुंबल्याने बसस्थानक, नविन भाजी मार्केटच्या जागेला तळ्याचे स्वरूप आले.

सुपा येथिल स्मशानभूमी लगत असणार्‍या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षीप्रमाणे, पहिल्याच पावसाने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने सुमारे 2 तास रस्ता बंद होता. यावेळी सुपा येथे कामानिमित्त आलेले ग्रामस्थ, एमआयडिसीतील कामगार, एसटी संपामुळे सुपा बसस्थानकात अडकून बसलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे ढगाळ वातावरण असतांना अचानक आलेल्या पावसांने शेतकर्‍यांचा शेतात साठवून ठेवलेला कांदा भिजला. तर बसस्थानकासमोर कंपाऊंडसाठी लावलेले पत्रे वादळाने भूईसपाट झाले. सुपा, हंगा, वाघुंडे, वाळवणे, रूईछत्रपतीमध्ये जोरदार तर पिंपरी गवळी, रांजणगाव, बाबुर्डी, कडूस, पळवे, जातेगाव परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान 24 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले असतांना 15 दिवसांचा कालावधी होवूनदेखील पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांमधून चिंता व्यक्त होत होती, शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पावसाळ्यापूर्वीची मशागत पूर्ण केली असून, शुक्रवारी वरूणराजाने जोरदार आगमन केल्याने खरिप हंगामातील पेरण्या होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सुपा- वाळवणे स्मशानभूमी लगत असलेल्या रस्त्यावरिल पुलाची उंची अतिशय कमी असल्याने, पाऊस झाल्यानंतर या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शाळेतील मुले, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, दुध उत्पादक शेतकरी, तरकारी उत्पादक शेतकरी यांच्यासह वाळवणे, रुईछत्रपती, पिंपरी गवळी, गणेशवाडी, रांजणगाव मशिदी, रायतळे, अस्तगाव, सारोळा कासार, विसापूर, भोयरे गांगर्डा, कडूस, सारोळा सोमवंशी लिंबी, चांभुर्डी सह श्रीगोंदाकडे जाणार्‍या प्रवाशांना तासंतास ताटकळत बसावे लागते. याची लोकप्रतिनिधींनी दखल घेवून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.