कंपन्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करावा - सुभाष देसाई
महाराष्ट्र हे अनेक बाबतीत अग्रेसर आहे. प्लास्टिक बंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्लास्टिक उत्पादन करणार्या कंपन्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी पुढाकार घेऊन या क्षेत्रातही राज्याला आघाडीचे राज्य बनवावे, असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. ‘बॉटल्स फॉरचेंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘बॉटल्स फॉरचेंज’ या अंतर्गत बिसलेरी या संस्थेमार्फत प्लॅस्टिक पुनर्वापर करण्यासाठी मुंबईत ठिक ठिकाणी विघटन करणारी मशिन बसविण्यात येणार आहेत. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना युवा प्रमुख अदित्य ठाकरे उपस्थित होते
देसाई यांनी सांगितले, प्लास्टिक निर्माण करणार्या कंपन्यांना आपल्या उत्पादनातील एक टक्का रक्कम विघटन, प्लास्टिक वेचणार्यांसाठी खर्च करावा, जेणेकरून जो वर्ग मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करतो, त्यांना फायदा होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. प्लास्टिकचा बंदोबस्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून सामजिक जाणिवेने प्लास्टिक बंदीच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मात्र प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, राज्य सरकारने पर्यावरण संवर्धानासाठी राज्यात प्लास्टिक बंदी केली असली तरी त्याची प्रत्यक्षात अमंलबजावणी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यात दररोज बाराशे टन प्लास्टिक तयार होते. परंतु त्याचे विघटन होण्याचे प्रमाण कमी आहे. प्लास्टिकचे विघटन करणार्या क ारखान्यांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना बाजूच्या राज्यांमधून राज्यात प्लास्टिक दाखल होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यापार्यांच्या बाटल्या पकडल्या त्याच व्यापार्यांनी प्लास्टिकबंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती कदम यांनी यावेळी दिली.
प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग, जॅकेट, जोडे, खुर्च्या, शोभेच्या वस्तू व इतर उपयोगी सामान तयार करण्यात येणार आहेत. यावेळी या मोहिमेशी संबधित संकेतस्थळ आणि टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटन करण्यात आले.