Breaking News

संगमनेर, अकोलेसाठी वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो !


अकोले / प्रतिनिधी । 
संगमनेर-अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले मुळा नदीवरील, पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे मुळा नदी वाहती झाली आहे. रात्रीपासून भंडारदरा पाणलोटात पावसाने उघडीप घेतल्याने धरणात पाण्याची आवक मंदावली आहे.
मुळा नदीच्या पाणलोटात दोन दिवसांपासून मूसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. या पावसामुळे मुळा नदीवरील आंबित हे पहिले धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरण भरल्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. 600 दलघफू क्षमता असलेल्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची दोन दिवसांपासून  मोठी आवक सुरू होती. या धरणात पाणी साचल्याने कोतुळचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. मंगळवारी दुपारपासून मुळा खोर्‍यात पावसाने उघडीप घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक मंदावली होती. धरण रात्री 12 वाजता पूर्ण क्षमतेने भरले अन, पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले. सध्या पिंपळगाव खांड धरणातून 1 हजार कुसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोटात पावसाने पुन्हा एकदा जोर दाखविला तर, मुळेच्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भंडारदरा पाणलोटात मंगळवारी पावसाने थोडी उघडीप घेतल्यामुळे धरणाच्या, प्रमुख पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी कोसळला आहे. भंडारदरा धरणात आज सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे एका दिवसात 766 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 3686 द.ल.घ.फूटवर जावून पोहचला आहे. सध्या भंडारदरा धरणातून 800 कुसेक्स वेगाने निळवंडे धरणात विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणातून 1 हजार कुसेक्स वेगाने पाणी प्रवरापात्रात झेपावत आहे. भंडारदरा पाणलोटात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आज दिवसभरात धरणात नव्याने दाखल होणार्‍या पाण्याची आवक मंदावण्याची शक्यता आहे. अकोले तालुक्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : भंडारदरा 43 मिमी, घाटघर 72 मिमी, रतनवाडी 60 मिमी, वाकी 72 मिमी, पांजरे 77 मिमी, निळवंडे 17 मिमी, कोतुळ 01 मिमी, अकोले 10 मिमी.

तालुक्यातील आढळा विभागाला वरदान ठरलेल्या 1090 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात अजून थेंबभर पाण्याची ही आवक झाली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वरुणराजाने या परिसरात कृपादृष्टी दाखविल्यास धरण लवकरच ओसंडून वाहू शकेल.

 भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस कोसळला आहे. तरीही निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन सुरू आहे. पावसाळ्यात सिंचनाच्या आवर्तनाची गरज काय? असा सवाल शेतकरीच उपस्थित करू लागले आहेत. जलसंपदा विभाग या पाण्याची एक प्रकारे नासाडीच करीत आहे. हे आवर्तन बंद केले तर, धरणांतील पाणी अधिक प्रमाणत शिल्लक राहिल व धरणे ही लवकर पूर्ण क्षमतेने भरतील, अशा चर्चा शेतकरीबांधव करीत आहेत.