शाहू महाराजांच्या विचारांची आज नितांत गरज : सभापती झावरे
पारनेर / प्रतिनिधी ।
न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी इतिहास विभागातील प्रा. आबासाहेब गंडाळ, प्रा. भिमराज काकडे यांनी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. शेतकरी, कष्टकरी, वंचित, अस्पृश्य, कामगार या सर्वांसाठी शाहू महाराजांनी जे महान कार्य केले, त्याविषयी सविस्तर चर्चा केली.
प्रा. विरेंद्र धनशेट्टी यांनी शाहू महाराजांनी जे करवीर व्यासपीठ स्थापन केले. त्या पाठीमागील पार्श्वभूमी सविस्तर सादर केली.
यावेळी सभापती राहुल झावरे म्हणाले की, आज आपल्या अवती भवतीच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर लक्षात येते की, आज शाहू महाराजांचे विचार पेरण्याची निंतात गरज आहे. पुढील पिढ्यांना आपण जर आपल्या परंपरा, आपलं संचित चांगल्या पध्दतीने समजावून सांगू शकलो तर, बलशाली भारताच्या दिशेने आपण निश्चित जाऊ शकतो.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, आजच्या तरुणांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांची चरित्रे वाचायला हवीत, अभ्यासाबरोबरच इतर अवांतर ग्रंथांचे वाचन केल्यास, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक स्वतंत्र ओळख तयार करता येईल. एक चांगला माणूस म्हणून ती तुमची समाजातील अतिशय चांगली ओळख असेल. यावेळी श्वेताली चौधरी या विद्यार्थिनीने शाहू महाराजांचे सामाजिक विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरेश शेळके यांनी तर, आभार उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे यांनी मानले.