Breaking News

शनिशिंगणापूर देवस्थानची ‘राजकीय’ धुसफूस चव्हाट्यावर!


अहमदनगर / बाळासाहेब शेटे 
शिर्डी आणि कोल्हापूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थान ताब्यात घेण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरु झाल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिल्याने त्याला पुष्टी मिळत आहे. वास्तविक पाहता सन २००५ मध्ये ज्यावेळी माजी आ. शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची या देवस्थानवर विश्वस्तपदी वर्णी लावण्यात आली, तेव्हापासूनच शिंगणापूर गावात ‘राजकीय’ धुसफूस सुरु झाली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मात्र ती चव्हाट्यावर आली. परंतु सरकारचा हा निर्णय गावाच्या विरोधातील असल्याने ग्रामस्थांमधून याविषयी नाराजी व्यक्त होत आहे. 

स्व. बाबुराव बानकर यांनी हे देवस्थान सर्वांच्या नजरेत यावे, देवस्थानची महती आणि किर्ती जगभर पसरावी, यासाठी दि. १८ जुलै १९६३ रोजी या देवस्थानची ए- ५८७ क्रमांकाने अधिकृत नोंदणी केली. तेव्हापासून या देवस्थानावर वारकरी संप्रदायाची पताका फडकत आहे. स्व. बानकर यांनी स्वतःच्या घरात व्हीआयपी कक्ष स्थापन करून ४० वर्षे शनिदेव आणि शनिभक्तांची सेवा केली. हे करीत असताना देवस्थानमध्ये त्यांनी कधीही राजकारण येऊ दिले नाही. १९९१ साली प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी या देवस्थानवर आधारित शनिदेवांच्या गाण्यांची ध्वनिफीत प्रसारित केली. त्यांनतर स्व. गुलशन कुमार यांनी १९९५ साली ‘सूर्यपुत्र शनिदेव’ हा चित्रपट प्रदार्शित केला आणि या देवस्थानची महती जगभर पोहोचली. 

गेल्या पाच वर्षांपूर्वी अर्थात २००५ साली या देवस्थानवर माजी आ. गडाखांच्या समर्थकांची करण्यात आलेली नियुक्ती विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे यांना खटकली आणि आ. मुरकुटेंसह भाजपचे नितीन दिनकर, शिवसेनेचे प्रकाश शेटे, शिंगणापूर देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी या निवडीच्या विरोधात मुख्यमंत्री आणि न्यायालयात तक्रारी केल्या. दरम्यानच्या काळात या देवस्थानमध्ये गैरव्यवहाराचेही आरोप झाले. देवस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ यांच्याविषयीही तक्रारी करण्यात आल्या. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांनाही हे देवस्थान गडाखांच्या ताब्यात गेल्याने भाजप समर्थकांना ही निवड प्रचंड जिव्हारी लागली. त्यातूनच ‘मुळा’च्या विस्तारीकरणाला सरकारने ना हरकत दाखला न देणे, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेणे, मुळा एजुकेशन संस्थेची चौकशी लावणे या सर्व प्रक्रिया सुरु झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गडाखांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दिलेला ‘शब्द’ पाळला नसल्याने तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, अशीही शंका ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्र्यांना मिळाले ३२ पानी पत्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रँक ३ च्या एका ज्येष्ठ नेत्याने शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांच्या २००५ मध्ये झालेल्या निवडी कशा चुकल्या, हे दाखविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल ३२ पानांचे पत्र पाठविले आहे. या पत्रात मुळा एजुकेशनच्या कामगारांना नियुक्ती देण्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हे ३२ पानांचे पत्र आणि आ. मुरकुटेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची किनार सरकारच्या या निर्णयाला आहे, हे मात्र यथावकाश स्पष्ट होईलच. 
 
निर्णय ग्रामस्थांच्या हिताचा नाही

स्व. बाबूराव बानकर आणि स्व. भाऊसाहेब शेटे यांनी ज्या शुद्ध हेतूने या देवस्थानची नोंदणी केली, त्या हेतूला या निर्णयामुळे तडा जाऊ शकतो. याच गावचा रहिवाशी या देवस्थानचा विश्वस्त होऊ शकतो, अशी घटना त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र देवस्थान सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर राज्यातील कोणालाही विश्वस्त होता येणार आहे. सरकारचा हा निर्णय स्थानिक ग्रामस्थांवर अन्यायकारक ठरू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या तो हिताचा नाही. 

संभाजी दहातोंडे, अध्यक्ष, शिंगणापूर बचाव कृती समिती.