Breaking News

लालपरी आगारात उभी...!

कुमार कडलग, संदीपकुमार ब्रम्हेचा/नाशिक । 08 :
विविध आंदोलनांच्या पार्श्‍वभूमीवर जीव धोक्यात घालून प्रवाशांची वाहतूक करणारा एस.टी.चा कर्मचारी आज स्वतःच आंदोलकाच्या भुमिकेत येऊन एस.टी.ची चाके थांबविण्यास कारणीभूत ठरला आणि पहिल्याच दिवशी नाशिक विभागाला लाखो रूपयांच्या उत्पन्नाचा फटका बसला. या संपाला कर्मचार्‍यांची वेतनवाढ या मुद्याची किनार लाभली असली तरी संघटनांवर असलेला पक्षिय राजकारणाचा पगडा, संघटनांमधील हेवेदावे आणि वेतनवाढीच्या मुद्यावरून श्रेय लाटण्याची सुंदोपसुदी या संपाला खर्‍या अर्थाने कारणीभूत ठरली आहे.
गेल्या वर्षी ऐन दिवाळीत एस.टी. कामगारांनी केलेला संप एस. टी. महामंडळासह सरकारलाही फटका देणारा ठरला होता. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल झाले ते आणखी वेगळे. मात्र पदरात वेतनवाढ पाडून घेतल्या शिवाय माघार घ्यायची नाही, या निर्धाराने सकल कामगार संपात सहभागी झाले.
कामगार संघटनांच्या ऐक्याचा अपेक्षित परिणाम साधला जाऊन सरकारला नमते घ्यावे लागले, अर्थात सरकार नमले असे दाखवले गेले तरी प्रत्यक्षात तात्काळ लाभ मात्र क ामगारांच्या पदरात पडली नाही. नेहमीप्रमाणे आश्‍वासनांवर बोळवण करून सरकारने कामगारांची समजूत काढली आणि मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यासाठी वेळ (अभ्यास क रण्यासाठी) मागून घेतला होता.
दरम्यानच्या काळात हा मुद्दा सर्वसाधारण पातळीवर विस्मरणात गेला. नेत्यांच्या पातळीवर अधुनमधून धुनी देत वेतनवाढी मुद्दा धगधगत ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता.
अचानक परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक जुनला एस. टी. च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वेतनवाढ जाहीर केली आणि इथेच खर्‍या अर्थाने विद्यमान संपाची बीजे पेरली गेली.
वेतनवाढ एस. टी. कर्मचार्‍यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. याबाबत कुणी आर्थिक तोट्याचा साप मारण्यासाठी कामगारांचे हक्क बळी देण्याचा प्रमाद करण्याची गरज नाही. मात्र हा हक्क मिळवतांना नेत्यांनी वस्तुस्थिती लपवून आपला झेंडा उंच करण्यासाठी व्यवस्थेला आणि सामान्य प्रवाशांना वेठीस धरण्याचे पाप करू नये.
मुळ मुद्दा वेतनवाढीचा आहे. परिवहन मंञ्यांनी वेतनवाढ केली. त्याची तपशीलवार माहीती या संपाची तयारी सुरू करेपर्यंत संपकरी नेत्यांनी पुर्ण समजून घेतली नाही. या नेत्यांना नेमक काय हव आहे, आणि मंत्र्यांनी काय दिले आहे? या दोन मुद्यांमध्ये किती अंतर आहे यावर खरे तर चर्चेतून मार्ग निघणे शक्य होते आणि आहे. तथापी वेतनवाढीचे श्रेय सत्ताधार्‍यांना सहजासहजी जाऊ द्यायचे या राजकीय मानसिकतेची मुख्य किनार या संपाला असू शकते. आणि म्हणूनच इंटकसारख्या या संघटनेने संपाची हाक देणे याविषयी आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. पण या संपाला भाजपा प्रणित कामगार संघटनेने सक्रीय पाठींबा देणे कामगार हितापेक्षा राजकारणाचा भाग मोठा असल्याचे स्पष्ट करते. राज्यात मुख्यमंत्री भाजपाचा असतांना भाजपा प्रणित एस. टी.कामगार संघटनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात हक्काने बसून परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या वेतनवाढीतील त्रुटी दुर करू शकतात. मात्र एवढा साधा सरळ धोपट मार्ग सोडून संपात सक्रीय होण्यामागे भाजपा प्रणित संघटनेचा राजकारणाशिवाय आणखी वेगळा हेतू काय असू शकतो? सरकारमधील शिवसेना भाजपातील शितयुध्द आणि विरोधी पक्षांचे राजकारण यामुळे हा संप घडवून आणला गेला. यापेक्षा वेगळा अर्थ काढता येणार नाही.
या संपामुळे पुन्हा एकदा भरडला जातोय तो सामान्य प्रवाशी. कुठलीही पुर्व सुचना न देता अचानक झालेला हा संप पहिल्या दिवशी हजारो प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरला. एरवी अन्य कुठल्याही आंदोलनात लाल परीसह प्रवाशांच्या जीवासाठी आपला जीव धोक्यात घालणारा, आंदोलकांचे दगड झेलणारा एस. टी. चा कर्मचारी स्वतःच आंदोलक बनल्याने लाल परी आगारात विसावा घेत बिच्चारी उभी आहे.
चौकट
अत्यंत उच्चतम पगारवाढ दिलेली असतांना इतर कामगार संघटनानी संपाचे हत्यार उपसने अत्यंत चुकीचे असून पगारवाढीवर आक्षेप असल्यास 9 जुन रोजी संघटनांना आपली भू मिका मांडण्याची संधी महामंडळाने दिली होती. तरीही हा संप केवळ राजकीय हेतूने होत आहे.
- सुभाष जाधव, राज्य संघटक एस.टी कर्मचारी सेना