जामखेडमध्ये प्लॅस्टिक बंदीने संभ्रमाचे वातावरण
जामखेड / ता. प्रतिनिधी
राज्य सरकारकडून 23 जूनपासून प्लॅस्टिक आणि थर्माकोलविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही बंदी त्वरित लागू केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण असून शासनाने तो दूर केलेला नाही. पर्याय दिला नसल्याने मालाची विक्री करणे अवघड झाले आहे. प्लॅस्टिक, थर्माकोलला पर्याय देवून त्याची अंमलबजावणी गरजेची होती. ठोस पर्याय मिळेपर्यंत या निर्णयास चार महीने पावसाळा संपेपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ते व जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी केली.
राज्य शासनाने प्रथम प्लॅस्टिक वापरास योग्य पर्याय द्यावा. राज्यात सर्वत्र प्लॅस्टिक तसेच प्लॅस्टिक पिशव्या वापरास बंदीचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तहसील विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतांना सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक होते. प्लॅस्टिक वस्तू निर्मिती करणार्या उद्योजकांवर त्याचे गंभीर परिणाम होणार असून, बेरोजगारी निर्माण होईल. हे लक्षात घेवून तूर्तास प्लॅस्टिक बंदीला स्थगिती द्यावी आणि सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून, योग्य तो पर्याय सूचवावा.प्लॅस्टिक बंदीचा निर्णय योग्यच आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने प्रत्येक व्यक्तीस अडचण निर्माण झाली आहे. एकतर कशावर बंदी आहे, हेच स्पष्ट होईना त्यामुळे समाजात सगळीकडे व्यापारी, शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पावसाळा संपेपर्यंत चार महिण्यांकरिता प्लॅस्टिक बंदिचा निर्णयास स्थगिती घ्यावी, नंतर धडाकेबाज मोहीम सूरू करावी, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचेकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी गणेश भळगट, अमोल ताथेड, सुमित चाणोदिया, नायब तहसीलदार विजय भंडारी उपस्थित होते.