Breaking News

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर दहन


अहमदनगर (प्रतिनिधी)- संविधानाचा अवमान करणार्‍या मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने दहन करण्यात आले. तर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असताना त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल ओहळ, उपाध्यक्ष मोहन ठोंबरे, पंकज लोखंडे, युवराज पाखरे, रमेश गायकवाड, सुरेश कांबळे, शरद सरोदे, धोंडीबा आव्हाड, विकास गायकवाड, लक्ष्मण मघाडे, जोसेफ पवार, सयाजी पातारे आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी नंदुरबार येथील धर्मसभेत संविधानाचा देशाचा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमान करणारे वक्तव्य केले होते. सर्व धर्म समभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा असून, मनूने जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानव वंशशास्त्र असल्याचा त्यांचा दावा आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याचे ते सांगतात. भीमा कोरेगाव दंगलीचे ते मुख्य सुत्रधार असून, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सभेच्या माध्यमातून माथी भडकविण्याचे कार्य करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर रविवारी पटेल मंगल कार्यालयात होत असलेल्या त्यांच्या सभेला विरोध दर्शविण्यात आला आहे.