Breaking News

सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्याचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांचे निर्देश


मुंबई : सेवा हक्क कायद्यानुसार विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व सेवा ऑनलाईन पुरविण्यात याव्यात. नागरिकांना सर्व सेवांसाठी एकाच वेबपोर्टलवर अर्ज करता यावा यासाठी सर्व विभागांच्या सेवांचे एकत्रीकरण (इंटीग्रेशन) करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज दिले.
लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विविध विभागांची बैठक श्री. क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा आदी उपस्थित होते.